शिरीष देशपांडे, सीए व सायबर गुन्हेविषयक अभ्यासक
व्हॉट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स आदी सोशल मीडियाचा वापर आता अगदी सहज झाला आहे. लोक वैयक्तिक फोटो, व्हिडीओ, माहिती अगदी सर्रास यावर टाकत असतात. याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेतात आणि आर्थिक फसवणूक करतात. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सावधपणे गरजेचे आहे. यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मर्यादित वापर : सोशल मीडियाचा अतिवापर टाळावा. अजिबातच वापर करायचा नाही, असे न करता दिवसातील किती तास त्यासाठी द्यायचे, हे ठरवून तेवढाच वेळ त्यासाठी देण्याची सवय लावणे उपयोगी ठरेल.
घाईत प्रतिसाद नको : अनेकदा एखादी पोस्ट आली, की लगेच त्याला प्रतिसाद देण्याची घाई अनेकजण करतात. त्यामुळे अनेकदा गोंधळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे घाईत उत्तर देऊ नका.
इंटरनेट कॉल सावधपणे : कोणताही व्हिडीओ कॉल आल्यावर घाईने उचलू नका. आधी नंबर ओळखीचा आहे का, फोटो ओळखीचा आहे का ते बघा, नंतरच फोन उचला. अनेकदा अनोळखी नंबर दिसतो, मात्र फोटो ओळखीचा असतो, अशावेळी सावध राहा. चोरट्याने मुद्दाम आपल्या ओळखीचा किंवा प्रसिद्ध व्यक्तीचा फोटो वापरलेला असतो. ‘डीपफेक’ तंत्रज्ञान वापरून, हुबेहूब नक्कल वापरून खोटे व्हिडीओ/ऑडिओ तयार करता येतात, हे लक्षात ठेवा.
हक्काचा सुरक्षा ग्रुप हवा : आपले शेजारी, नातेवाईक, आपल्या सोसायटीमधील उत्साही कार्यकर्ते यांचा संपर्क ग्रुप करावा. यातील लोक कोणत्याही क्षणी मदतीला नक्की येतील.
तपासणी आणि साफसफाई : आपण ज्या ग्रुपमध्ये आता आहोत किंवा जो ग्रुप जॉइन करत आहोत, त्यातील लोक कोण आहेत ते तपासा. त्यातील माहितीच्या लोकांशी विचारविनिमय करा आणि योग्य वाटले तरच तो ग्रुप चालू ठेवा. सोशल मीडियाची अधूनमधून साफसफाई करा. सोशल मीडियावरील महत्त्वाच्या गोष्टी स्वतःलाच ई-मेल कराव्यात, त्या हव्या तेव्हा मिळतात आणि सोशल मीडियामधून गेल्या तर वाईट वाटत नाही.
आत्मसुरक्षा : सर्व सोशल मीडिया खाती सुरक्षित करण्यासाठी सेटिंग करून घ्या. एक वाक्य लक्षात ठेवा, ‘आपले आई-वडील सोडून कोणीही काहीही फुकट या जगात देत नसतो.’
आपल्या जवळच्या एकट्या राहणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी बाकीच्या लोकांनी मुद्दाम सुरक्षा कवच तयार करणे गरजेचे आहे. उदा. आठवड्यातून एकदा त्या व्यक्तीला भेटून सर्व काही ठीकठाक आहे ना, हे पाहावे. फोनमधील सोशल मीडियाचा बॅक-अप घ्यावा, यासाठी जवळच्या माहितगाराचेच साह्य घ्यावे.