मिलिंद पुरोहित, निवृत्त वरिष्ठ बँक अधिकारी
अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडतो, की आपण बॅंकेत ठेवलेल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजातून होणारी उद््गम करकपात (टीडीएस) टाळता येते का? पण आपल्याला माहीतच आहे, की बॅंका आणि तत्सम वित्तीय संस्थांमध्ये ठेवलेल्या मुदत ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर प्राप्तिकर कायद्याप्रमाणे ‘टीडीएस’ करणे त्या-त्या संस्थांना बंधनकारक आहे. यासाठी लागू असणाऱ्या नियमांत एक एप्रिल २०२६ पासून काही बदल केले आहेत. यात प्राप्तिकर कायद्यान्वये लागू असलेले कलम, व्याजाच्या उत्पन्नाची मर्यादा, सूट मिळण्यासाठी भरण्याचे फॉर्म आदी गोष्टी समाविष्ट आहेत. त्यातील काही ठळक बदलांची (विशेषतः मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर होणारी करकपात)
थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे-
व्याजाच्या रकमेवर होणारी करकपात टाळण्यासाठी एकाच बॅंकेत मोठी रक्कम ठेवण्याऐवजी निरनिराळ्या बँकेत ठराविक रक्कम ठेवली तर काय होईल, ते काही उदाहरणांवरुन बघू या.
उदाहरण क्र. १ ः एखाद्या ज्येष्ठ नागरिक असणाऱ्या व्यक्तीने जर रु. १२,७५,००० हे एका वर्षांसाठी द.सा.द.शे. ७.५० टक्के संचयी ठेव (क्युम्युलेटिव्ह) प्रकारात ठेवले, तर वार्षिक व्याज ९८,३४८ मिळेल. ही व्याजाची रक्कम एक लाख रुपयांच्या आत असल्याने ‘टीडीएस’ होणार नाही. अशी रक्कम निरनिराळ्या बॅंकेत ठेवली तर करकपात टाळता येईल.
उदाहरण क्र. २ ः वर उल्लेख केल्याप्रमाणे जर याच व्यक्तीने त्याच बॅंकेत रु. १२,७५,००० ऐवजी रु. २५,५०,००० ठेवले असते, तर व्याजाचे उत्पन्न रु. १,९६,६९६ इतके झाले असते. ही व्याजाची रक्कम एक लाख रुपयांच्या मर्यादेच्या वर गेल्याने ‘टीडीएस’ म्हणून रु. १९,६६९.६० एवढी रक्कम कापली गेली असती. (‘पॅन’ आहे असे गृहीत धरून). जरी या व्यक्तीचे एकत्रित उत्पन्न प्राप्तिकर मर्यादेच्या आत असेल तरी कापलेला कर हा प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) भरून परत मागावा लागला असता.
वरील उदाहरणात दाखविल्याप्रमाणे जर वेगवेगळ्या बॅंकेत ठराविक रकमेच्या ठेवी ठेवल्या तर ‘टीडीएस’ टाळता येऊ शकतो.
फायदा : उदाहरण क्र. १ मध्ये व्याजाचे उत्पन्न एक लाख रुपयांच्या आत राहिल्याने ‘टीडीएस’ झाला नाही.
तोटा : निरनिराळ्या बॅंकेत जाऊन खाते उघडण्याची व दरवर्षी ‘टीडीएस सर्टिफिकेट’ मिळविण्याची तसदी घ्यावी लागेल.
(टीप : हा लेख व त्यातील उदाहरणे ही फक्त माहितीसाठी आणि प्रातिनिधिक स्वरुपाची आहेत. व्यक्ती आणि त्यांच्या वार्षिक उत्पन्नाप्रमाणे नियम व अटी लागू शकतात. त्यामुळे आपल्या कर सल्लागाराचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर ठरते.)
जुने नियम ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू होते. नवे नियम एक एप्रिल २०२६ पासून लागू झाले आहेत.
१. जुना नियम- प्राप्तिकर कलम १९४(ए)
नवा नियम- प्राप्तिकर कलम ३९३
२. व्याज मर्यादा/एकूण व्याज-
६० वर्षांखालील व्यक्ती
अ. जुना नियम- व्याज रक्कम : रु. ४०,०००
नवा नियम- व्याज रक्कम : रु. ५०,०००
६० वर्षांवरील व्यक्ती (ज्येष्ठ नागरिक)
ब. जुना नियम- व्याज रक्कम : रु. ५०,०००
नवा नियम- व्याज रक्कम : रु. १,००,०००
३. उद््गम करकपात (टीडीएस)
प्रचलित नियमात बदल नाही.
नियम : ‘पॅन’ असेल तर १० टक्के
‘पॅन’ नसेल तर २० टक्के
४. ‘टीडीएस मधून सूट मिळण्यासाठी फॉर्म
जुना नियम- अन्य नागरिक फॉर्म १५ जी
ज्येष्ठ नागरिक फॉर्म १५ एच
नवा नियम- सर्वांसाठी फॉर्म क्र. १२१