म्युच्युअल फंड : म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे काय करावे?
esakal April 13, 2026 09:45 AM

डॉ. वीरेंद्र ताटके. गुंतवणूक विषयाचे अभ्यासक

जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अवघ्या तीन महिन्यांपूर्वी ८५ हजार अंशांच्या पातळीवर पोचलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्स’ आता ७७ हजार अंशांच्या आसपास पोचला आहे. या घसरणीचे पडसाद म्युच्युअल फंड गुंतवणुकीवरही उमटू लागले आहेत. हमखास लाभदायी ठरणाऱ्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीतही अनेकांना तोटा दिसू लागल्याने गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचे महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे समजून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न : वर्षांपूर्वी सुरु केलेल्या ‘एसआयपी’द्वारे झालेल्या गुंतवणुकीत तोटा दिसत आहे. अशी ‘एसआयपी’ बंद करावी का?

उत्तर : काही गुंतवणूकदार एका वर्षातच ‘एसआयपी’च्या कामगिरीचा आढावा घेतात, पण हा दृष्टिकोन चुकीचा आहे. ‘एसआयपी’ ही दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची पद्धत आहे. बाजारातील चढ-उतारांमध्येच तिचा खरा फायदा मिळतो. त्यामुळे घाबरून ती बंद करण्याऐवजी ती सुरू ठेवणे अधिक सूज्ञपणाचे ठरेल.

प्रश्न : गेली पाच वर्षे सुरू असलेल्या ‘एसआयपी’च्या माध्यमातून केलेल्या गुंतवणुकीचे जानेवारी २०२६ मध्ये दिसत असलेले मूल्य आता खूप कमी झाले आहे. काय करावे?

उत्तर : पाच वर्षे सुरू असलेल्या गुंतवणुकीचे सध्याचे मूल्य कमी झाले असेल, तर त्याकडे नकारात्मकतेने पाहण्याची गरज नाही. उलट, आता कमी ‘एनएव्ही’मध्ये अधिक युनिट मिळत आहेत. म्हणजेच, ही घसरण दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी संधी आहे.

प्रश्न : सध्या तोट्यात चाललेल्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून पैसे काढून बँकांच्या मुदत ठेवींमध्ये ठेवावेत का किंवा त्यातून सोने खरेदी करावे का?

उत्तर : बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर सध्या बरे वाटत असले तरी म्युच्युअल फंडातील गुंतवणूक अल्पकाळात काढणे योग्य नाही. कमी कालावधीत बाहेर पडल्यास त्यावर अल्पकालीन भांडवली लाभाच्या नियमानुसार कर भरावा लागतो. याउलट, तोट्यात विक्री करणे तर अजिबातच टाळावे, कारण असे करून आपण गुंतवणुकीच्या मूळ उद्देशालाच विसरतो. त्याचप्रमाणे सोन्यात गुंतवणुकीचा विचार चांगला असला तरी त्यासाठी म्युच्युअल फंड तोट्यात विकू नयेत.

प्रश्न : सध्याच्या घसरणीत एकरकमी गुंतवणूक करावी का?

उत्तर : कमी भावात गुंतवणूक करण्याचा विचार योग्य असला तरी सध्याच्या अस्थिर बाजारात मोठ्या एकरकमी गुंतवणुकीपेक्षा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे अधिक योग्य आहे. आपली एकूण गुंतवणूक पाच-सहा भागात विभागून टप्प्याटप्याने गुंतवावी. यासाठी एक वर्षाची ‘एसआयपी’ सुरू करणे हा सुद्धा योग्य पर्याय ठरू शकतो. अशा गुंतवणुकीसाठी नवा फंड शोधण्यापेक्षा ज्या फंडात आपली दीर्घकालीन ‘एसआयपी’ सुरु आहे, तोच फंड निवडावा.

प्रश्न : सध्य परिस्थितीत फंड निवडताना काय पाहावे? काय पाहू नये?

उत्तर : फंडाचे मूलभूत गुंतवणूक धोरण, फंड मॅनेजरचा अनुभव, पोर्टफोलिओची गुणवत्ता आणि दीर्घकालीन कामगिरी या बाबींचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, अल्पकालीन चढ-उतारांवर आधारित निर्णय टाळावेत.

प्रश्न : सध्याच्या तणावपूर्व परिस्थितीकडे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी कसे पाहावे?

उत्तर : जागतिक पातळीवरील तणावपूर्ण परिस्थितीचा परिणाम भारतीय शेअर बाजारांवर होत आहे. मात्र, दीर्घकालीन दृष्टीकोनातून पाहता, भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आणि स्थिर आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय न घेता, नियमित गुंतवणूक (एसआयपी) सुरू ठेवत संयम आणि शिस्त राखणे आवश्यक आहे. अशा काळात सातत्यपूर्ण गुंतवणूक भविष्यात चांगले परतावे देऊ शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.