शिर्सुफळ, ता. १३ : शिर्सुफळ (ता. बारामती) येथील श्री शिरसाईदेवीच्या यात्रेला शनिवारी (ता. ११) घटस्थापनेने सुरुवात झाली. यात्राकाळात मंदिरात दररोज पहाटे महापूजा होऊन सकाळ-संध्याकाळ आईसाहेबांचा छबिना मंदिरप्रदक्षिणा होते. बुधवारी (ता. १५) पाचव्या माळेपासून वाघ्या-मुरळीचा कार्यक्रम व देवीचा छबिना पालखीसह मंदिरप्रदक्षिणा होणार आहे. शनिवारी (ता. १८) आठवी आणि नववी माळ घालून घटाचे विसर्जन करण्यात येणार आहे. या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात येत आहेत. मुख्य यात्रा अक्षय तृतीयेनंतर सोमवारी (ता. २०) आणि मंगळवारी (ता. २१) होणार आहे. याबाबत यात्रा उत्सव कमिटीप्रमुख आप्पासाहेब आटोळे यांनी माहिती दिली. पहिल्या दिवशी पहाटेपासून भाविक देवीचे दर्शन, चोळी-पातळ व दंडवत घेतात. तसेच, संध्याकाळी परिसरातील रावणगाव, कटफळ, पारवडी, गोजूबावी, या गावांच्या देवतांचे छबिने येतात. मध्यरात्री परंपरेप्रमाणे रावणगाव (ता. दौंड) यांचा राक्षसदहन कार्यक्रम व फटाक्यांची आतषबाजी होणार आहे.