बाजारात सोन्यापेक्षा केशर भारी
काश्मिरी मोगरा दोन लाख १० हजार रुपये किलो
वाशी ता. १३ (बातमीदार) ः सोन्याच्या दराने विक्रम गाठत असताना काश्मिरी केशरनेही बाजारात जोरदार उसळी घेतली आहे. नवी मुंबईत दाखल झालेल्या मोगरा जातीच्या केशरचे भाव प्रतिकिलोला दोन लाख १० हजार रुपयांवर गेल्याने सोन्याला मागे टाकले आहे.
मुंबई एपीएमसी बाजारात एप्रिलमध्ये काश्मिरी मोगरा केशर एक लाख ६० हजार रुपये किलोला विकला जात होता. औषधी गुणधर्मांमुळे तसेच खाद्यपदार्थांमध्ये वापर वाढल्याने केशरची मागणी सातत्याने वाढत आहे. अशातच काश्मीरमध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर यादरम्यानच केशरचे उत्पादन होते. त्यामुळे उपलब्धता कमी, मागणी जास्त अशी परिस्थिती असल्याने भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
-----------------------------
कोट्यवधींची उलाढाल
- बाजारात केशरचे तीन प्रकार येतात. मोगरा, लच्छा, किसवाड अशी दर्जानुसार त्यांची विभागणी होते. यामध्ये मोगरा केशराला सर्वाधिक मागणी असून, भावही गगनाला भिडले आहेत.
- मुंबईसह नवी मुंबईत केशरचे १५० हून अधिक व्यापारी असून, या व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल होते. त्यामुळे आगामी काळातही भाव उच्च पातळीवरच राहण्याची शक्यता व्यापारी अर्जुनभाई यांनी वर्तवली आहे.