Chhatrapati Sambhajinagar: खर्चाचा भुर्दंड नागरिकांवर नको; पाण्याच्या मीटरचा ५१४ कोटींचा नव्याने प्रस्ताव
esakal April 15, 2026 11:45 AM

छत्रपती संभाजीनगर: शहराच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात आल्याने महापालिकेने नळांना मीटर लावण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ५१४ कोटींचा मीटरचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता.

मात्र, त्यात सुधारणा करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. मीटरच्या खर्चाचा बोजा महापालिका व सामान्य नागरिकांवर पडू नये, यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्य सचिव राजेंश अग्रवाल यांनी आयुक्त अमोल येडगे यांना दिले. त्यानुसार आता येत्या आठवड्यात सुधारित प्रस्ताव शासनाला सादर केला जाणार आहे.

शिक्षकांच्या पगारी थांबल्या! सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ २१३ माध्यमिक शाळा, ज्युनिअर कॉलेजमधील शिक्षकांची पगारबिलं अपलोड होईनात; ‘ही’ आहेत कारणे

नव्या २७४० कोटी रुपयांच्या पाणी योजनेचे काम अंतिम टप्प्यात असून, महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनीकडून युद्धपातळीवर काम सुरू आहे. या योजनेत शहरात २४ तास ७ दिवस पाणी देण्याचे नियोजन आहे.

त्यात नळाला मीटर बसविणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने वॉटर मीटर बसविण्यासाठी शासनाला ५१४ कोटी खर्चांचा डीपीआर तयार करून शासनाला सादर केला आहे. या प्रस्तावावर मुख्य सचिव अग्रवाल यांच्याकडे नुकतीच बैठक झाली. त्यात वॉटर मीटरच्या प्रस्तावावर चर्चा झाली.

ढिंग टांग : होर्मुझ : पाणसुरुंगांवर नामी उपाय..!

महापालिकेवर मीटरच्या खर्चाचा बोजा पडू नये, ही खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी आयुक्तांना केली. सुधारित प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले. दरम्यान, शासन आदेशानंतर महापालिकेने सविस्तर सुधारित प्रस्ताव तयार करण्यास सुरवात केली आहे.

मोफत मीटरवरही विचार

छोट्या म्हणजेच ६०० स्केअर फुटापर्यंतच्या घरांना मोफत मीटर देण्याचे नियोजन सध्याच्या निविदेत आहे. नव्या पाणी योजनेत मीटरसाठी १०० कोटींची तरतूद आहे. त्यातून हा खर्च भागविला जाणार होता. आता त्यावर देखील विचार करून सविस्तर प्रस्तावात काही सुधारणा केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.