रुपाली चाकणकरांनी स्पष्टीकरण देताच तृप्ती देसाई भडकल्या, म्हणाल्या गेले 28 दिवस…
Tv9 Marathi April 15, 2026 02:45 PM

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची गुंतागुंत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तनम्य चाकणकर यांची 13 एप्रिलला तब्बल आठ तास चौकशी केली. यानंतर प्रतिभा चाकणकरांनी सर्व आरोप फेटाळून लावले. प्रतिभा चाकणकरांच्या चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी खरात प्रकरणात कोणत्याही आर्थिक व्यवहारात,जमीन व्यवहारात व इतर कोणत्याही दुष्कृत्यात दुरान्वये आमचा संबंध नाही. शेवटी सत्य प्रखरतेने समोर येईलच,हा माझा दृढ विश्वास आहे, असे म्हटले होते. आता यावर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया देत रुपाली चाकणकरांवर निशाणा साधला.

रूपाली चाकणकर झोपल्या होत्या का?

अशोक खरात प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली. या प्रकरणावरुन तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्या कार्यक्षमतेवर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यावेळी त्यांनी प्रशासनावरही संगनमताचा आरोप केला आहे. गेले २८ दिवस रूपाली चाकणकर झोपल्या होत्या का? आता त्यांना जाग कशी आली? जर त्यांची प्रतिमा मलीन झाली असेल, तर त्यांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचे होते. इतके दिवस त्या गायब का होत्या? असा सवाल तृप्ती देसाईंनी उपस्थित केला.

रूपाली चाकणकर, त्यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब अशोक खरातचे भक्त होते. प्रतिभा चाकणकर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असून, खरातला विलन ठरवून स्वतःला हिरो दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका तृप्ती देसाई यांनी केली. या प्रकरणी तृप्ती देसाई यांनी पोलीस प्रशासनावरही गंभीर आरोप केले आहेत.

केवळ दोन महिन्यांचा कालावधी

आयजी दत्ता कराळे यांचा कार्यकाळ केवळ दोन महिन्यांचा उरला आहे. त्यांनी अशोक खरातला पाठीशी घालण्याचे काम केले आहे. त्यामुळे दत्ता कराळेंची तातडीने चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच, अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळाल्यास त्याला चांगलाच धडा शिकवला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

या प्रकरणात प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून संबंधित राजकारण्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला आहे. अमरावती येथील अल्पवयीन मुलींच्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी या घटनांना तातडीने लगाम लावण्याची मागणी केली. विशेषतः लव्ह जिहादच्या नावाखाली मुलींना जाळ्यात अडकवणाऱ्या टोळ्यांचा नायनाट करणे आता काळाची गरज आहे, असे तृप्ती देसाई यांनी ठामपणे सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.