स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
रजत वशिष्ट, एबीपी माझा, नागपूर April 19, 2026 06:43 PM

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी (Kamthi) येथील गांधीनगर भाजी मंडी (Gandhinagar Bhaji Mandi) परिसरात रविवारी सकाळी गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत अतुल उर्फ बंटी पानतावणे (Bunty Panatwane) या 40 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. जुनी कामठी पोलीस (Old Kamthi Police) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पानतावणे कुटुंबीय सकाळी घरात असताना स्वयंपाकघरात गॅस गळतीमुळे प्रथम आग लागली आणि त्यानंतर अचानक सिलेंडरचा स्फोट झाला.

Nagpur Cylinder Blast Incident : गॅस गळतीमुळे भीषण स्फोट

प्राथमिक माहितीनुसार, अतुल पानतावणे यांच्या पत्नी चहा बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या असता गॅस गळतीमुळे आग लागली. काही क्षणातच सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला आणि आग घरभर पसरली.

Fire Spread Damage : आगीत घराचे मोठे नुकसान

स्फोटानंतर लागलेली आग काही वेळातच संपूर्ण घरात पसरली. घरातील जीवनावश्यक वस्तू, सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रिज, कपडे यांसह सर्व साहित्य जळून खाक झाले. या आगीत सुमारे 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

Rescue Operation : कुटुंबीयांनी घेतली जीव वाचवण्यासाठी धाव

आग लागल्यानंतर पत्नी व मुले तात्काळ घराबाहेर पडण्यात यशस्वी झाली. मात्र, अतुल पानतावणे हे बेडरूममध्ये अडकून पडल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.

Injured Persons : आग विझवताना जखमी

आग विझवण्याच्या प्रयत्नात विनय पानतावणे, नितीन पानतावणे तसेच शेजारी संध्या ढवळे यांच्यासह इतर काही जण किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले.घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.

Police Investigation : पोलीस तपास सुरू

घटनेची नोंद जुनी कामठी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत जुमडे (Prashant Jumde) आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर (Manish Hiwarkar) यांनी घटनास्थळी पाहणी केली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Public Demand : कुटुंबीयांना मदतीची मागणी

दरम्यान, स्थानिक नागरिकांनी मृताच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.