सूर्य कोपला! विदर्भात उन्हाचा तीव्र तडाखा; अकोला ठरलं देशातील सर्वाधिक उष्ण शहर, उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
रजत वशिष्ठ, एबीपी माझा April 15, 2026 06:13 PM

Maharashtra Weather Update: विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र झाला असून हवामान विभागाकडून पुढील आठ दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अकोला (Akola)शहरात सुमारे 44 अंशांसह देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. तर नागपूरमध्ये ही काल (14 एप्रिल) 42.2 अंश तापमान नोंदवले गेले. विदर्भात अमरावती (43.8), वर्धा (43.5), यवतमाळ व गडचिरोली (42.6) आणि वाशीम (42.4) येथेही तीव्र उष्णता (Vidarbha Heat Wave) जाणवली आहे. सलग काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे आता सकाळपासूनच उकाडा जाणवत असून दुपारी परिस्थिती अधिक बिकट होत आहे.

नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसात ही तापमान 43 ते 45 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने पुढील काही दिवसांचा यलो अलर्ट जारी केला आहे. नागरिकांना दुपारी बाहेर पडताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रामुख्याने विदर्भाकडे सध्या उत्तरेकडून येणारे वारे वाहत असून उत्तरेतून येणारे वारे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या शुष्क आणि अतिउष्ण भागातून येत असल्यामुळे त्यांच्या प्रवाहात मध्य भारत आणि विदर्भातही उष्णतेची लाट आल्याचा हवामान विभागाचे म्हणणे आहे.

Akola News: अकोल्यात उष्माघाताचा पाहिला बळी?, मालवाहू ऑटोमध्ये आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

अशातच, अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीये. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी या ठिकाणी व्यक्त केलाय. मृतदेह शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यू मागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची चर्चा आहे. दरम्यान, अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून तापमानात मोठी वाढ झाली आहे.. काल अकोल्यातील तापमान जगातील दुसऱ्या क्रमांकावर होतं.. 44 अंश सेल्सिअस इतकं तापमान अकोल्यात नोंदविण्यात आलं होतंये.

मागील काही दिवसातील अकोल्यातील तापमान

14 एप्रिल : 44 अंश सेल्सियस.

13 एप्रिल : 43.8 अंश सेल्सियस.

12 एप्रिल : 43.1 अंश सेल्सियस.

11 एप्रिल : 42.1 अंश सेल्सियस.

10 एप्रिल : 40.1 अंश सेल्सियस.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.