अज्ञात महिलेच्या मदतीला टिटवाळा पोलिसांचा धाव
esakal April 15, 2026 09:45 PM

अज्ञात महिलेच्या मदतीला टिटवाळा पोलिसांची धाव

टिटवाळा, ता. १५ (वार्ताहर) : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातून माणुसकीचा हळवा पण आश्वासक अनुभव देणारी घटना समोर आली आहे. रस्त्यावर बेवारस अवस्थेत सापडलेल्या एका अज्ञात महिलेच्या मदतीसाठी कल्याण तालुका पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि तत्परता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

मंगळवारी (ता. ७) सुमारे ३० ते ३५ वयोगटातील एक महिला अत्यंत असहाय्य अवस्थेत आढळून आली. तिची ओळख पटत नव्हती, नातेवाइकांचा कोणताही मागमूस नव्हता. अशा परिस्थितीत ही आपली जबाबदारी नाही असे म्हणत पुढे न जाता, पोलिसांनी तिच्याकडे माणूस म्हणून पाहत तातडीने मदतीचा हात पुढे केला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लाड आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासो एडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहकर्मी अविनाश पाटील, अशोक बागूल व गांगुर्डे यांच्या मदतीने पुढाकार घेतला. या पथकाने महिलेची सुरक्षितता सुनिश्चित करीत तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. यासाठी मुंबईतील चेंबूर येथील ग्रेस फाउंडेशन या संस्थेशी संपर्क साधून अधिकृत पत्राद्वारे मदतीची विनंती करण्यात आली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यावर न थांबता तिच्या उपचारांची व पुढील काळजीची जबाबदारी निश्चित व्हावी यासाठीही पोलिसांनी विशेष प्रयत्न केले.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला टिटवाळा परिसरातीलच रहिवासी असून, कोरोना काळात नातेवाइकांचे निधन झाल्याने तिची मानसिक अवस्था ढासळली होती. ती बराच काळ एकटी व निराधार अवस्थेत परिसरात भटकत होती. तिच्या पायाला गंभीर जखम होऊन त्यात संसर्ग झाल्यामुळे तिची प्रकृती अधिकच खालावली होती. महिलेची ही अवस्था पाहून सहाय्यक पोलिस निरीक्षक सरला काळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता मदतीसाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कृतीतून संवेदनशीलतेचा प्रत्यय आला.

सुमारे ३५ वर्षे वयाच्या या महिलेचे नाव नंदिनी शाकियत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. गोरा वर्ण, सडपातळ बांधा, अंगावर पिवळसर टॉप इतपतच तिची ओळख असली तरी तिच्या मदतीला धावून आलेले हात मात्र माणुसकीची खरी ओळख ठरले. या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले, की पोलिस केवळ कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक नसून, समाजातील दुर्बल घटकांसाठी आधारस्तंभ आहेत. आम्ही आहोत, हा विश्वास कृतीतून दाखवून देणारी ही घटना अनेकांच्या मनाला स्पर्शून जाणारी ठरत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.