आंदोलनकर्त्यांबाबत इराणचा धडकी भरवणारा निर्णय, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार; सार्वजनिक चौकात क्रेनला लटकवून...
विशाल देवकर April 16, 2026 10:43 AM

Bita Hemmati तेहरान: अमेरिका आणि इराणमध्ये (US Iran War) चर्चेची पहिली फेरी निष्फळ ठरल्यनंतर आता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न सुरु आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये चर्चेची दुसरी फेरी 16 एप्रिलला होण्याची शक्यता आहे. अशातच अमेरिकेसोबत शस्त्रसंधी सुरू असताना, इराण सरकारने घेतलेल्या एका कठोर निर्णयाची सध्या जगभरात चर्चा आहे. इराणमध्ये आंदोलनकर्त्यांवर कारवाई तीव्र होत असून पहिल्या महिला प्रदर्शनकर्तीला फाशी देण्याची तयारी सुरू आहे. या वर्षी जानेवारीत झालेल्या आंदोलनांशी संबंधित आरोपांखाली फाशी देण्यात येणारी बीता हेमती ही पहिली महिला आहे. तिला तिच्या पतीसोबत फाशी देण्यात येईल, अशी माहिती आहे. दरम्यान या निर्णयाविरोधात मानवाधिकार संघटनांनी तीव्र आक्षेप घेत तातडीने हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Tehran News : आंदोलनांच्या संबंधात यापूर्वीच सात जणांना मृत्युदंड

दरम्यान, सध्या इराणमध्ये एकूण चार कैद्यांना फाशी दिली जात आहे. या व्यक्तींनी सुरक्षा दलांना जखमी केले आणि शस्त्रांचा वापर केला, असे तेहरानच्या एका न्यायालयाने जाहीर केले आहे. बीता हेम्माती आणि त्यांचे पती मोहम्मदरेझा माजिदी यांच्या व्यतिरिक्त, त्यांच्यासोबत त्याच इमारतीत राहणाऱ्या आणखी दोन जणांनाही मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांची नावे बेहरूझ जमानिनेजाद आणि कुरोश जमानिनेजाद आहेत. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, तेहरानने या आंदोलनांच्या संबंधात यापूर्वीच सात जणांना मृत्युदंड दिला आहे.

Bita Hemmati : या महिलेचा गुन्हा काय?

वास्तविक पाहता, इस्लामी नियमांनुसार, सरकारविरुद्ध केलेले कोणतेही कृत्य हे अल्लाहविरुद्ध केलेले कृत्य मानले जाते. यासाठी मृत्युदंडाची शिक्षा आहे. या महिलेवर आणि तिच्या पतीवर तोच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिणामी, इराणमधील आंदोलनांदरम्यान अटक झालेल्या आणि ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्या प्रत्येकाला 'अल्लाहचा शत्रू' घोषित करून शिक्षा दिली जाते. एका मानवाधिकार संस्थेनुसार, चारही कैद्यांवर अमेरिकी सरकारच्या सांगण्यावरून काम केल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणे आणि कट रचल्याचाही आरोप आहे. त्यांची सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या बातमीवर पाश्चात्य माध्यमांमध्ये चर्चा होत आहे.

सार्वजनिक चौकात क्रेनला लटकवून फाशी?

होय, अहवालानुसार इराणमध्ये पहाटे फाशी देण्याची प्रथा सामान्य आहे. मृत्युदंडासाठी फाशी देणे ही सर्वात पसंतीची पद्धत आहे. ही कठोर शिक्षा अनेकदा अमली पदार्थांशी संबंधित गुन्हे, खून आणि राजकीय मतभेदांसाठी वापरली जाते. कधीकधी, सार्वजनिक चौकात क्रेनला लटकवून फाशी देण्याच्या घटनाही घडल्या आहेत. निकाल देताना इराणी न्यायाधीशांनी सांगितले की, या लोकांनी 8 आणि 9 जानेवारी रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा दलांना जखमी केले आणि स्फोटक सामग्री व अज्ञात शस्त्रांचा वापर केला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.