मुंबईकरांवर मोठं संकट, येत्या 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात; धरणांची स्थिती काय?
Tv9 Marathi April 16, 2026 03:45 PM

गेल्या काही दिवसांपासून मुंबई उन्हाचे चटके बसताना दिसत आहे. यंदा कडक उन्हाळ्यामुळे आणि अल-निनो या हवामान बदलाच्या परिणामामुळे मुंबईवर पाणी टंचाईचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मुंबईकरांना भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने येत्या १ मे पासून शहरात १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय विचाराधीन ठेवला आहे. याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

ही कपात का करावी लागत आहे?

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांमध्ये सध्या ३३.६० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. हे पाणी ७ जुलैपर्यंत पुरेल इतके आहे. मात्र, यंदा पाऊस उशिरा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे जुलै संपल्यानंतर ऑगस्ट महिन्यापर्यंतची सोय करण्यासाठी प्रशासनाला आतापासूनच पाणी जपून वापरणे गरजेचे वाटत आहे. तसेच, वाढत्या उष्णतेमुळे धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. ज्यामुळे पाणीसाठा वेगाने कमी होत आहे.

मुंबईला तानसा, भातसा, मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दररोज ४,१०० दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाते. १५ एप्रिल २०२६ रोजीच्या आकडेवारीनुसार, भातसा धरणामध्ये सर्वात जास्त साठा आहे.

धरणांमधील पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये):
  • भातसा: २,३५,४३९
  • मध्य वैतरणा: ६९,१०६
  • अप्पर वैतरणा: ७७,०४५
  • तानसा: ४०,८१७
  • मोडक सागर: ४५,३४०
  • विहार: १५,३५३
  • तुळशी: ३,२७४
मागील वर्षांशी तुलना

यंदाचा साठा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत थोडा जास्त असला तरी तो पूर्णपणे सुरक्षित नाही.

  • २०२६: ३३.६० टक्के
  • २०२५: ३०.२४ टक्के
  • २०२४: २४.५४ टक्के
प्रशासनाचे नियोजन काय?

राज्य सरकारने महापालिकेला जुलैऐवजी ऑगस्टपर्यंत पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. येत्या १ मेपासून १० टक्के कपात केल्यास, पावसाळा सुरू होईपर्यंत मुंबईकरांना अखंडित पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असा पालिकेचा विचार आहे. अद्याप पाणी कपातीबद्दल प्रशासनाने अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु पाणी कपात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरण्यास सुरुवात करावी आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असा सल्ला पालिकेने नागरिकांना दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.