रुग्णालयांची सुरक्षा वाऱ्यावर
अग्निशमनचा ‘ना हरकत दाखला’नसल्याचे समोर
विरार, ता. १६ (बातमीदार)ः वसई-विरार पालिका हद्दीत ३२४ नोंदणीकृत खासगी रुग्णालये आहेत. त्यापैकी ३५ ते ४० रुग्णालयांकडे अग्निशमन विभागाकडून ‘ना हरकत दाखला’ नसल्याचे समोर आहे. त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या काही काळापासून राज्यात रुग्णालयांना आयसीयू विभागांना आग लागून निष्पाप रुग्णांचे बळी जाण्याच्या घटना घडत आहेत. ‘बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट’नुसार कोणत्याही रुग्णालयाची नोंदणी किंवा नूतनीकरण करताना अग्निशमन दलाचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक आहे. मात्र, नियमाला केराची टोपली दाखवली जात आहे. अनेक रुग्णालयांमध्ये आगीशी लढण्यासाठी पुरेशी यंत्रणा नाही. अरुंद जिने, आपत्ती काळात बाहेर पडण्याचा मार्ग नसल्याने दुर्घटना घडल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या बाबीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
------------------------------
‘शॉर्टसर्किट’चा धोका
रुग्णालयांमध्ये विशेषतः आयसीयूमध्ये व्हेंटिलेटर, एअर कंडिशनिंग, इतर वैद्यकीय उपकरणांचा २४ तास वापर होतो. यामुळे ‘शॉर्टसर्किट’ होण्याच्या घटना वाढल्या आहेत. उपकरणांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष रुग्णांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे कायद्यानुसार रुग्णालयांना दर सहा महिन्यांनी अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र (फॉर्म बी) सादर करणे अनिवार्य आहे.
===========================================
नियम काय सांगतो?
आणीबाणीच्या प्रसंगी आग आटोक्यात आणण्यासाठी लागणारी साधने, पाण्याचे स्रोत, बाहेर पडण्याचे मार्ग नियमानुसार असणे आवश्यक आहे. अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास आरोग्य विभाग, पालिकेकडून रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यासह दंडही ठोठावला जाऊ शकतो.
------------------------
वसई-विरार शहरातील रुग्णालयांची चौकशी करून संबंधित विभागाला कारवाईस सांगण्यात येईल.
-रोहन मोरे, अग्निशमन मुख्याधिकारी, पालिका