चास : ग्रामीण भागातील जनता आरोग्याकडे दूर्लक्ष करते त्यामुळे आजार बळावत जातो व पर्यायाने भविष्यात गंभीर आजारांना सामोरे जावे लागते यासाठी ग्रामीण भागात आरोग्य शिबीरे गरजेची असून वाडा व परिसर हा रोगमुक्त कसा राहील या साठी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजप सहकार आघाडी उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर शेटे यांनी वाडा (ता.खेड ) येथे व्यक्त केले.
अनुगामी लोकराज्य अभियान, सहकारत्न बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठान, समर्थ युवा फाऊंडेशनच्या विशेष सहकार्याने व अमितदादा शेटे मित्रपरिवाराच्या वतीने वाडा येथे गुरूवार ता. 16 रोजी मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महिलांसाठी मेमोग्राफी (स्तनाच्या कर्करोगाची तपासणी), ब्लड प्रेशर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, सीबीसी, रक्तगट तपासणी अशा विविध 9500 रुपये किमतीच्या आरोग्य सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण 565 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबीरात नागरिकांना आरोग्य तपासणीबरोबरच शासकीय योजना नोंदी यामध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना व आयुष्मान भारत कार्ड याची नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी भाजप सहकार आघाडी उत्तर पुणे जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर शेटे, पंचायत समिती सदस्य मनिषा हिले, सरपंच रुपाली मोरे, उद्योजक अमित शेटे, देवराम शेटे, रमेश पावडे, शिवाजी मोरे, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मस्के, आत्माराम कौदरे, कैलास हुंडारे, संतोष सुपे, गोरक्षनाथ कडलग तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, सहकारत्न बाळासाहेब महादेव शेटे लोकसेवा प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, स्वामी समर्थ महीला मंडळ व वनिता महीला मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या.
या शिबीरासाठी सहकारमंत्री ना. चंद्रकांत पाटील व समर्थ युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे यांचे विशेष सहकार्य लाभले.