डॉ. स्मिता प्रकाश जोशी, समुपदेशक
प्रश्न : माझ्या लग्नाला ९ वर्षे झाली आहेत आणि आम्हाला दोन मुली आहेत. आम्ही संयुक्त कुटुंबात आई-वडिलांबरोबर राहतो. माझी पत्नी स्वभावाने खूप संशयी आहे. ती केवळ बाहेरील लोकांवरच नाही, तर कधी कधी माझ्या रक्ताच्या नात्यांवरही संशय घेते. त्यामुळे घरात सतत तणावाचे वातावरण असते. मला सासऱ्यांकडून समजले की तिच्या आईचाही स्वभाव असाच संशयी होता. मी स्वभावाने मोकळा आणि हसत-खेळत राहणारा आहे. मला माझ्या कुटुंबातील सर्व नात्यांना जपायचे आहे. अशा परिस्थितीत मी काय करावे?
उत्तर : तुमची समस्या केवळ ‘स्वभावाचा प्रश्न’ नसून त्यामागे खोल मानसिक आणि भावनिक कारणे असण्याची शक्यता आहे, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
तुमच्या पत्नीच्या वागण्यामागे काही संभाव्य कारणे असू शकतात- तिच्या बालपणातील अनुभव (‘अपब्रिंगिंग’). उदा. जर ती लहानपणापासून अशा वातावरणात वाढली असेल जिथे संशय, असुरक्षितता किंवा अविश्वास होता, तर तो ‘पॅटर्न’ तिच्या मनात खोलवर बसलेला असू शकतो. दुसरे म्हणजे अनुकरण (‘लर्न्ड बिहेव्हियर’). तिच्या आईचाही स्वभाव संशयी असेल, तर तिने नकळत तोच दृष्टिकोन स्वीकारलेला असू शकतो. त्यामुळे तिच्या मनात सतत असुरक्षितता, गमावण्याची भीती, कमी आत्मविश्वास किंवा नात्यांबद्दल असलेली भीती असू शकते; यामुळे संशय वाढतो.
संशय हा मानसिक आजाराचा- म्हणजे ‘पॅरानॉइड पर्सनॅलिटी डिसॉर्डर’ किंवा इतर चिंताविषयक (अँग्झायटी) समस्यांचा भाग असू शकतो. अशा वेळी केवळ समजावून सांगून संशय कमी होत नाही, तर त्याला मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीची गरज असते.
तुम्ही पत्नीशी वाद घालण्यापेक्षा शांतपणे आणि संयमाने संवाद साधा. ‘तू चुकीची आहेस,’ असे म्हणण्याऐवजी ‘आपल्या नात्यात विश्वास वाढवण्यासाठी आपण काय करू शकतो?’ असा दृष्टिकोन ठेवा. तिच्या भावना नाकारू नका, पण संशयाला पुष्टीही देऊ नका. शक्य असल्यास तिच्यासाठी समुपदेशकांची मदत घ्या. स्वतःचीही मानसिक ताकद टिकवून ठेवा- कारण तिच्या सततच्या संशयामुळे तुम्हालाही ताण येऊ शकतो.
योग्य समुपदेशन आणि उपचारांनी अशा स्वभावात सुधारणा होऊ शकते. त्यामुळे आशा सोडू नका, पण योग्य व्यक्तींची मदत घ्या.
प्रश्न : माझे वय ३८ वर्षे व पतीचे ४० वर्षे आहे. आम्हाला एक मुलगा आहे. माझे पती खूप नियंत्रण आणि वर्चस्व गाजवणारे आहेत. स्वतःची चूक ते कधीही मान्य करत नाहीत. सतत मला दोष देतात. एकदा मी मित्राशी बोलत होते; त्यावरून त्यांनी संशय घेतला. मलाही तेव्हा अपराधी वाटले होते. मी अनेक वेळा माफी मागितली, तरी तो मुद्दा ते सोडत नाहीत. तीच गोष्ट वारंवार काढून मला त्रास देतात. घराची आणि मुलाची जबाबदारी घेत नाहीत. आर्थिक बाबतीतही मला सतत मागणी करावी लागते. मी इंटरनेटवर मिळवलेल्या माहितीनुसार माझे पती ‘नार्सिसिस्टिक’ आहेत. अशा व्यक्तीबरोबर एकत्र राहणे अवघड आहे. मला या नात्यातून कशी सुटका मिळवता येईल?
उत्तर : तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, त्यात तुमची घुसमट, एकटेपणा आणि अन्यायाची भावना पूर्णपणे समजण्यासारखी आहे. सतत दोष देणे, जुन्या गोष्टी उकरून काढणे आणि जबाबदारी टाळणे, या गोष्टी कुणालाही मानसिकदृष्ट्या थकवणाऱ्या असतात; पण इथे एक महत्त्वाची गोष्ट शांतपणे समजून घ्यायला हवी. हल्ली समाजमाध्यमे वा ‘पॉडकास्ट’मधील काही गोष्टी ऐकून अर्धवट माहितीच्या आधारे एखाद्याच्या वर्तनाला लगेच ‘नार्सिसिस्ट’ असे लेबल लावले जाते. प्रत्यक्षात हा एक ‘क्लिनिकल डायग्नोसिस’ आहे. तो तज्ज्ञांकडूनच ठरवला जातो. प्रत्येक वर्चस्ववादी, अहंकारी किंवा असंवेदनशील व्यक्ती ‘नार्सिसिस्ट’ असतेच असे नाही. तुमच्या पतींच्या वागणे- संशय घेणे आणि तो सोडून न देणे, स्वतःची चूक मान्य न करणे, जबाबदारी टाळणे, माझ्याच म्हणण्यानुसार व्हायला हवे अशा पद्धतीने वागणे, ही वागणूक नात्यासाठी नक्कीच हानिकारक आहे.
‘तो नार्सिसिस्ट आहे का?’ यापेक्षाही ‘तुम्हाला या नात्यात सुरक्षितपणे, आदराने आणि स्थिरपणे कसे राहता येईल?’ हे विचारात घेणे महत्वाचे आहे.
पतीने वारंवार जुन्या गोष्टी काढल्या, तर ‘ही गोष्ट आपण आधीच बोलून संपवली आहे. पुन्हा पुन्हा यावर बोलल्याने मला त्रास होतो,’ हे शांतपणे सांगा. तुमच्याकडून झालेल्या चुकीबद्दल तुम्ही माफी मागितली आहे; आता तुम्ही सतत स्वतःला दोष देत राहणे थांबवा. आर्थिक आणि मुलाच्या बाबतीत ठोस चर्चा करून काही ठराविक अपेक्षा स्पष्टपणे मांडा. पतीशी वाद घालणे, आरोप करणे टाळा. स्वतःची ताकद आणि संयम वाढवा.
नात्यातून ‘सुटका’ हा शेवटचा पर्याय असतो. तो विचार करण्यापूर्वी नाते सुधारण्यासाठी शक्य ते प्रयत्न करा.