विकास लवांडेंना तात्काळ अटक करा, अन्यथा राज्यभर आंदोलन करणार, वारकरी सांप्रदाय आक्रमक 
सुनील दिवाण, एबीपी माझा April 18, 2026 07:13 PM

सोलापूर :  वारकरी संप्रदायात घुसखोरी करणाऱ्या महाराजांची यादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी सोशल मीडियात दिल्यानंतर वारकरी सांप्रदाय आक्रमक झाला आहे. या प्रकरणी त्यांना तात्काळ अटक करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलने करण्याचा इशारा आज पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत संत मंडळींनी दिला आहे. आज पंढरपूर येथील संत कबीरदास महाराज यांच्या मठात सांप्रदायातील फडकरी दिंडीकरी वारकरी संप्रदायातील विविध संघटना आणि संतांचे वंशज यांची एक तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी विकास लवांडेच्या विरोधात आक्रमर पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. 

 शासनाने कारवाई न केल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा

या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विकास लवांडे यांनी वारकरी सांप्रदायाबाबत सोशल मीडियात केलेल्या पोस्ट नंतर सांप्रदाय आक्रमक झाला आहे. तातडीने विकास लवांडे यांनी ज्या संतांची नावे घुसखोर म्हणून जाहीर केलेत त्यांची तात्काळ पायावर डोके ठेवून माफी मागावी अशी मागणी केली आहे. लवांडे यांना तात्काळ अटक करावी अन्यथा शासनाला वारकरी संप्रदायाची ताकद दाखवून द्यायची वेळ येईल असा इशाराही या बैठकीत देण्यात आला आहे. याबाबत आज पंढरपूर पोलीस ठाण्यात लवांडे यांच्या विरोधात निवेदन दिले जाणार असून यानंतर शासनाने कारवाई न केल्यास संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा वारकरी सांप्रदायाच्या वतीने देण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय हा संयमी म्हणून ओळखला जात असला तरी वेळ पडल्यास आम्ही वजरा होऊनही कठीण आहोत हे दाखवून देऊ आणि यातून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडल्यास या शासन जबाबदार असेल असा इशाराही वारकरी संप्रदायाच्या वतीने देण्यात आलेला आहे. यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि वारकरी संप्रदाय यांच्या तील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायातील 20 घुसेखारांची नावेच जाहीर केली

वारकरी सांप्रदायामध्ये प्रतिगामींची घुसखोरी वाढली असून त्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळत आहे, असे मोठे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले होते. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट वारकरी संप्रदायातील 20 घुसेखारांची नावेच जाहीर केली. यावरुनच आता  नवा वाद उभा राहू लागला आहे. या यादीमध्ये अनेक संत महंतांची नावे असल्याने हा वारकरी सांप्रदायाचा अपमान असल्याचे सांगत हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.