पुणे : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ४२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून एका खासगी कंपनीच्या संचालकांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासाच्या अनुषंगाने संचालकाचे निवासस्थान, तसेच कार्यालयावर छापा टाकला.
वेलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज देण्यात आला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्वे रस्त्यावरील एका इमारतीत या कंपनीचे कार्यालय आहे. पोलिसांच्या पथकाने या कार्यालयावर छापा टाकला. त्यानंतर कंपनीचे संचालक बांदल आणि चोरगे यांच्या सॅलिसबरी पार्क, तसेच बिबवेवाडी भागातील निवासस्थानी सायंकाळी छापे टाकण्यात आले.
चोरगे आणि बांदल यांनी कंपनीत गुंतवणूक केल्यास परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ दरम्यान त्यांनी गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारले होते. सुरुवातीला त्यांनी परतावा दिला होता. त्यानंतर त्यांनी परतावा देणे बंद केले होते.
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांदल आणि चोरगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत त्यांनी दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत आहे.
विवेक मासाळ, पोलिस उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा