देगलूर : अकोला- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील देगलूरच्या महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टजवळ स्कुटी व तेलंगणा बसच्या झालेल्या भीषण अपघातात स्कुटीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर मारुती कोळनुरे किरकोळ जखमी झाले.
देगलूर आगारातील निवृत्त वाहक मारोती कोळनुरे हे पत्नीसह शनिवार ता. १८ एप्रिल रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास देगलूरहुन तेलंगणातील आपल्या लाडेगाव, ता. जुक्कल या गावाकडे जाण्यासाठी स्वतःच्या स्कुटी वरून पत्नीसह निघाले होते.
देगलूर- मदनुर रोड वरील महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्ट जवळ त्यांची स्कुटी(क्र. एम एच २६ बी .एच. ४४८९ ) आणि तेलंगणा राज्यातील बस (क्र. एपी-२५-झेड-००८६) यांच्यात धडक झाली. या अपघातात विजयाबाई मारोती कोळनुरे (वय ५५ वर्षे, रा. लाडेगाव मंडळ, जुक्कल, तेलंगणा) यांचा बसचे टायर डोक्यावरून गेल्यामुळे घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत आवश्यक ती कार्यवाही सुरू केली.अपघातानंतर काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मृतदेहाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर ते नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आले .या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून देगलूर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे सांगण्यात आले.
दोन महिन्यातला तिसरा अपघात...!
गेल्या दोन महिन्यापासून या रोडवर झालेला हा तिसरा अपघात असून मागच्या आठवड्यात या रोडवर झालेल्या अपघातात ग्राम विस्तार अधिकारी जागीच ठार झाले होते. येथील पेट्रोल पंप च्या रस्त्यावर गतिरोधक भरावे अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.