संस्कृतायन – हर्षाचे प्रातिभ रंग
Marathi April 19, 2026 08:25 AM

>> डॉ. समीरा गुजर जोशी, [email protected]

श्रीहर्षाने महाभारतातील परिचित अशा नल-दमयंतीच्या कथेवर आधारित नैषधीय चरित या महाकाव्यात आपल्या प्रतिभेने रंग भरले आहेत.  महाभारताची कथा ही थोडी रोखठोक आहे, परंतु तिच्यामध्ये रस निर्माण करण्याचे कौशल्य श्रीहर्षाने दाखवले आहे. विनोदाची सहज पेरणी करीत एक प्रकारचा मिश्कीलपणा आणि बुद्धिमान विनोद या काव्यात आढळतो.

आपण मागील लेखात पाहिले की, श्रीहर्षाने महाभारतातील परिचित अशा नल-दमयंतीच्या कथेवर आधारित नैषधीय चरित या महाकाव्याची रचना केली आहे. ही रचना करताना त्याने केवळ स्वयंवरापर्यंतची कथा निवडली आहे. यात त्याने मूळ कथेत आपल्या प्रतिभेने रंग भरले आहेत. काव्याचा मूळ रस अर्थात शृंगार आहे, पण त्याने विनोदाची जोडही त्याला दिली आहे.

महाभारताची कथा ही थोडी रोखठोक आहे. तिच्यामध्ये रस निर्माण करण्याचे कौशल्य श्रीहर्षाने दाखवले आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजहंसाचे पात्र. महाभारतातील वनपर्वात हा हंस फक्त चौदा श्लोकात येतो. महाभारतातला नल हंसाला सोडतो. कारण मी तुला दमयंती मिळवून देईन असे वचन हंस त्याला देतो. श्रीहर्ष मात्र या प्रसंगाकडे असा कोरडा व्यवहार म्हणून पाहत नाही. त्याचा हंस आणि नल राजा दोघेही अतिशय उदात्त व सुसंस्कृत आहेत. श्रीहर्षाने या हंसाची वृद्ध माता, नुकतीच प्रसूत झालेली बायको, सगेसोयरे या  सगळ्या  गोतावळ्याची कल्पना स्वतःच्या कल्पनेतून केली आहे. त्यामुळे त्या हंसाचे स्वरूप एक पक्षी असे न राहता, तो एक पात्र बनला आहे. नलाने त्याला पकडले होते ते कुतूहलापोटी आणि सोडून दिले ते मनातील करुणेमुळे. मला तुझे काही प्रिय करायचे आहे ही इच्छा हंसाने व्यक्त केली आहे. हंसाने दमयंतीचे वर्णन करून मी तिच्याकडे तुझा निरोप घेऊन जातो असे म्हटल्यावरही नल अतिशय संयमाने हंसाच्या परोपकारी स्वभावाचे कौतुक करत त्याला संमती देतो.

सुसंकृततेचा हा प्रत्यय नलराजाच्या व्यक्तिमत्त्वात ठायी ठायी येतो. नल राजाची प्रेमात पाहिली गेलेली सगळ्यात मोठी परीक्षा म्हणजे देवांनी नल राजाला आपला दूत म्हणून दमयंतीकडे पाठवणे. हा प्रसंग श्रीहर्षाने फारच सुंदर रंगवला आहे. नायक-नायिकेची प्रत्यक्षात समोरासमोर पहिलीच भेट आहे. दोघांनाही एकमेकांविषयी आकर्षण आहे आणि नायकाचे कर्तव्य मात्र इतके विचित्र आहे की, त्याला इतर कुणाची तरी तू निवड कर असे स्वतच्या तोंडून नायिकेला सांगायचे आहे. महाभारतातील नल राजा आडवाटेने दमयंतीला तू देवांना न निवडता मला निवड हे सुचवतो. श्रीहर्षाचा नल मात्र सुरुवातीला स्वतःची ओळखही देत नाही. दूत म्हणून आपले कर्तव्य तो चोख बजावतो. देवांना तिने वरावे यासाठी तिची मनधरणी करतो. मात्र ती अगदी निराश होते तेव्हा तिच्या दुःखाने व्याकूळ होऊन तो तिला स्वतःची ओळख देतो. या बदलांमुळे आपल्याला भेटणारा नल राजा हा अतिशय सहृदय, सुसंस्कृत, मनापासून प्रेम करणारा उदात्त प्रेमिक आहे. दमयंती ही त्याला साजेशी नायिका आहे.

त्याच बरोबरीने श्रीहर्षाने विनोदही सहज पेरला आहे. त्याचा कोटीबाजपणा वाखाणण्यासारखा आहे. ब्रिटिश साहित्यात एक प्रकारचा मिश्कीलपणा आणि ज्याला बुद्धिमान विनोद म्हणतात तो सहज आढळतो, तर भारतीय साहित्यात ही तो आहे याचे श्रीहर्ष एक उत्तम उदाहरण आहे.

नलासारख्या सुंदर व चतुर राजपुत्राला पाहून वरुण, अग्नी आणि इंद्र हे दमयंतीच्या स्वयंवराला आलेले देव जागच्या जागी थिजले हे सांगताना श्रीहर्ष लिहितो. वरुण जलदेवता असल्यामुळे तो विस्मय‘जड‘ झाला. अग्नीचे अंग तापले पण ते तो अग्नी (अनल ) होता म्हणून नव्हे तर तो नलासारखा नव्हता म्हणून! इंद्राने आपल्या सहस्र डोळ्यांनी आपल्या तनुकडे पाहिले व आपल्याला कौशिक (घुबड) का म्हणतात हे त्याच्या ध्यानी आले.

प्रसंगानुरूप सहज विनोद तो साधतो. इंद्राची आणि नलाची या आधी तशीच थेट झालेली नाही. इंद्र मात्र भेटल्यावर तुमचे नाव नल ना? असे विचारतो. हा गृहस्थ कोण, हा मला कसा ओळखतो असा त्याच्या चेहऱ्यावरचा गोंधळ वाचून इंद्र म्हणतो, अहो तुमचे स्वर्गस्थ वडील हे माझे स्नेही आहेत. तुमचा चेहरा हुबेहुब त्यांच्या सारखाच आहे. इथे स्वर्गस्थ शब्दामुळे गंमत येते. मार्मिकता हेही त्याचे वैशिष्टय़ आहे. साध्या उपमा उत्प्रेक्षांमधून तो खूप काही सांगून जातो. उदाहरणार्थ, बराच काळ जिच्या प्राप्तीची इच्छा केली ती दमयंती इंद्रादी देवांनी अखेर योग्य अशा नलाला दिली, पण ती देताना त्यांना मुळीच दुःख झाले नाही. कसे? तर खूप काळ मनात धारण करून ठेवलेली विद्या उत्तम शिष्याला देताना गुरूला खेद होत नाही त्याप्रमाणे. या उपमेमध्ये देवांची दमयंतीबद्दलची बदललेली भावना सुंदररीत्या सुचविली आहे.

आपल्या महाकाव्यांची वैशिष्टय़पूर्ण शैली यावरून लक्षात येते.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.