>> अरुण
नदीच्या गोड्या पाण्यापेक्षा समुद्राच्या खारट पाण्याची ‘बॉयन्सी’ किंवा एखादी वस्तू पृष्ठभागाकडे ढलण्याची म्हणजेच तरंगवण्याची क्षमता अधिक असते. म्हणूनच उत्तम तरणपटूंसाठी समुद्राचं पाणी सहाय्यक ठरतं. समुद्राच्या पाण्याच्या कैकपट मिठाचा अंश असेल तर पाण्याची घनता वाढते आणि असं पाणी त्याची ‘बॉयन्सी’ प्रचंड प्रमाणावर वाढल्याने कुणाला सहजतेने बुडू देत नाही. सध्या जो आखाती प्रदेश युद्धाच्या ज्वालांनी पेटला आहे, त्यातला एक प्रमुख देश म्हणजे इस्रायल. या देशापासून पलीकडे असलेल्या जॉर्डन देशाच्या मधोमध जो एक छोटासा सागर किंवा भलेमोठे सरोवर आहे त्याला ‘मृत’ समुद्र म्हणतात.
इथल्या पाण्याची ‘सॅलिनिटी’ किंवा खारटपणा इतर समुद्रांपेक्षा किंवा महासागरांच्या तुलनेत खूप अधिक म्हणजे 34 टक्के इतका आहे. सर्वसाधारणपणे समुद्राच्या पाण्यात मिठाचं प्रमाण 3.5 टक्के असते. त्या तुलनेत ‘मृत’ समुद्र किंवा ‘डेड-सी’चा खारेपणा विशेषच आहे. अतिखारटपणामुळे त्यामध्ये जलचरांचं प्रमाण शून्य आहे. माणसांसाठी मात्र तो ‘अ’मृत समुद्र म्हणायला हवा. कारण तो त्यामध्ये तरंगणाऱ्यांना बुडवत नाही. तिथला पाण्याची घनता इतकी की, ‘बॉयन्सी‘ (उसळी) प्रक्रियेने त्या पाण्यात पहुडणारा आपोआप तरंगतो. काही पर्यटक तर या ‘अ’मृत सागराच्या पाण्यावर आरामात पुस्तक वाचत पहुडलेले दिसतात!
इस्रायल आणि जॉर्डन या दोन देशांमधल्या दरीतला हा 600 चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा ‘डेड सी’ 300 मीटर खोल आहे. लाव्हा रसावर तरंगणाऱ्या टॅक्टॉनिक प्लेट या खडकाळ महाचकत्यांच्या उलात्याची निर्मिती झाली असं म्हटलं जातं. त्याला खारेपणा मात्र त्या भागातील भूगर्भात असलेल्या मिठाच्या साठय़ांमुळे आला आहे. मात्र काही कारणांनी त्याचं क्षेत्रफळ ‘आटत’ आहे. 1950 पेक्षा ते आता बरंच कमी झालंय. त्याच्या किनाऱ्यावर मिठाचे खडक तयार झालेले आढळतात. इतक्या खारटपणामुळे माणसांसाठी ‘अ’मृत ठरलेल्या समुद्राचे अतिखारं पाणी डोळ्यांत किंवा नाकातोंडात गेलं तर ते घातक ठरू शकतं.
आपल्याकडच्या अशनी आघाताने तयार झालेल्या प्रसिद्ध लोणार सरोवराचं पाणीही असंच खारट आहे. तिथे पर्यटक येतात ते प्रचंड अशनी (अंतराळातील महापाषाण) पडून हे सरोवर कसं निर्माण झालं ते पाहायला. त्या आघातानंतर तिथले मूळचे मिठाचे खडक आणि जलस्रोत यातून ते निर्माण झालेलं विस्मयकारी आणि तितकंच अभ्यासकांना संशोधनासाठी महत्त्वपूर्ण असं सरोवर ठरलंय.





