बॉलिवूड म्हणजे झगमगती दुनिया आहे. पण इथे जो टिकतो त्यालाच मान मिळतो. जो चर्चेत असतो त्यालाच विचारलं जातं. अनेक नवीन कलाकार दर वर्षी बॉलिवूडमध्ये येत असतात. कुणाला लोकप्रियता मिळते तर कुणाला मिळत नाही. मात्र इथे असे अनेक ज्येष्ठ कलाकार आहेत ज्यांनी आपलं आयुष्य अभिनयासाठी वाहून घेतलं. मात्र या कलाकारांची बॉलिवूडमध्ये किंमत केली जात नाही. अशाच एका ज्येष्ठ कलाकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून नेटकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
लवकरच 'गिन्नी वेड्स सनी २' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान ज्येष्ठ अभिनेते सुधीर पांडे यांना जशी वागणूक दिली गेली ती पाहून नेटकरी संतापले आहेत. ७२ वर्षीय दिग्गज कलाकाराचा झालेला हा अपमान पाहून नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या टीमवर जोरदार टीका केली आहे. नुकताच अविनाश तिवारी आणि मेधा शंकर यांच्या 'गिन्नी वेड्स सनी २' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सुधीर पांडे देखील उपस्थित होते. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये असे दिसत आहे की, स्टेजवर मुख्य कलाकार अविनाश आणि मेधा एकमेकांशी बोलण्यात व्यस्त आहेत, तर तिथेच उभे असलेल्या सुधीर पांडे यांच्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
व्हिडिओमध्ये दिसतं की, आपल्याला कोणीही विचारत नाही किंवा साधी दखलही घेत नाही हे लक्षात आल्यावर सुधीर पांडे अत्यंत शांतपणे स्टेजवरून खाली उतरले. खाली उतरतानाही त्यांनी एकदा मागे वळून पाहिलं की कदाचित कोणीतरी त्यांना थांबवेल, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
हा व्हिडिओ एक्स (ट्विटर), इंस्टाग्राम आणि रेडिटवर वेगाने व्हायरल होत आहे. यावर कमेंट करताना एका युजरने लिहिले, "हे अत्यंत अपमानजनक आहे, त्यांनी स्टेजवरून निघून जाऊन योग्यच केले." दुसऱ्या एका युजरने म्हटले की, "आजच्या पिढीला थोडं तरी ज्येष्ठ कलाकारांचा आदर करायला शिकवलं पाहिजे." काही नेटकऱ्यांनी तर "हेच बॉलिवूडचं खरं रूप आहे, इथे फक्त स्टारकिड्सना महत्त्व दिलं जातं," अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे.
सुधीर पांडे हे गेल्या अनेक दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी 'बुनियाद', 'बालिका वधू', 'ससुराल गेंदा फूल' यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात ओळख निर्माण केली आहे. तसेच 'शान', 'दयावान', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', आणि 'टॉयलेट एक प्रेम कथा' यांसारख्या मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. शाहरुख खानपासून अक्षय कुमारपर्यंत अनेक सुपरस्टार्ससोबत काम करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याला मिळालेल्या अशा वागणुकीमुळे चाहते प्रचंड नाराज आहेत.
अवघ्या ६ महिन्यात संपणार स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका? 'त्या' पोस्टमुळे चर्चांना उधाण, 'या' मालिकेची वेळ बदलली