सरकारी कार्यालयात कागदपत्रांसाठी सामान्य नागरिकांना अनेकदा नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं. भ्रष्टाचारी आणि उदासीन अधिकाऱ्यांमुळे नागरिकांना सतत सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. अधिकाऱ्यांच्या टोलवाटोलवीला संतापलेल्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची कागदपत्र वर्षभरापासून सापडत नसल्याचं कारण दिलं जात होतं. शेवटी तरुणाने अधिकाऱ्यांना आगळ्यावेगळ्या पद्धतीनं सुनावलं आहे. तरुणाने थेट अधिकाऱ्याच्या टेबलवर अर्धा किलो बदाम भरलेली पिशवी रिकामी केली आणि हे खा म्हणजे तुम्हाला फाईल कुठं ठेवलीय ते आठवेल असं म्हटलं. तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
छत्तसीगढच्या विलासपूरमधील हा व्हिडीओ आहे. तरुणाच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची एक फाईल गहाळ झाल्याचं कारण वर्षभरापासून सांगितलं जात होतं. प्रशासनातील अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा सर्वासमोर आणण्यासाठी शेवटी तरुणाने हा मार्ग पत्करला. त्यानं सरकारी कार्यालयात जात प्रॉपर्टी म्युटेशन ( नाव बदलणं) फाइल गहाळ झाल्याचं सांगणाऱ्या अधिकाऱ्यांच्या टेबलवर बदाम ओतले.सतत फाईल सापडत नसल्याचं कारण ऐकून तरुण वैतागला होता. तो यासाठी पाठपुरावाही करत होता. मात्र प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून काहीच हालचाल केली जात नव्हती.
Video: मंत्री बावनकुळेंची लव्ह स्टोरी! अल्पवयीन मुलीला पळवलं, मग थेट जेलमध्ये रवानगीअधिकाऱ्यांच्या टेलबवर बदाम फेकल्याचं कारण सांगताना तरुण म्हणतो की, हे बदाम खाल्ल्याने मेमरी सुधारते. आता या अधिकाऱ्यांनी बदाम खाल्ले तर त्यांचीही मेमरी सुधारेल आणि माझ्या फाईल्स कुठे ठेवल्यात तेही आठवेल.
तरुणाने म्हटलं की, जवळपास वर्षभरापूर्वी रिसेलच्या माध्यमातून एक फ्लॅट खरेदी केला होता. अनेकदा कार्यालयात जाऊन पाठपुरावा करूनही म्युटेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अधिकाऱ्यांनी प्रत्येकवेळी फाइल सापडत नाही असं सांगितलं. यांच्या कारभाराचा फटका मला बसत असून माझ्याकडे मालकी हक्काची कागदपत्रं नसल्याचंही तरुणाने म्हटलं.
तरुणाने हे प्रकरण सर्वांसमोर यावं यासाठी वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करण्याचं ठरवलं. त्यानं बदाम टेबलवर फेकून अधिकाऱ्यांना तुमच्या मेंदूची कार्यक्षमता सुधारण्याची गरज आहे आणि त्यासाठी बदाम खा असं सुनावलं. तरुणाचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय.