उरुळीत कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कॅमेऱ्याची नजर
esakal April 19, 2026 06:45 PM

उरुळी कांचन, ता. १९ : सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून गाव अस्वच्छ करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नागरिकांवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने अशा व्यक्तींवर ५०० रुपये दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला असून, १६ एप्रिलपासून याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.
घंटागाडीत कचरा न टाकता अनेक नागरिक रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे गावच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने प्रशासक मंडळाने कठोर पावले उचलली आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कचरा टाकणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून दंड वसूल केला जाईल.
तसेच, पहिल्यांदा कचरा टाकताना आढळल्यास ५०० रुपये, दुसऱ्यांदा १००० रुपये आणि तिसऱ्यांदा १५०० रुपये दंड अशी रचना असणार आहे. वारंवार नियम मोडणाऱ्या नागरिकांचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई करण्याचा इशाराही ग्रामपंचायतीने दिला. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून गावाची स्वच्छता राखावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.