खामेनेईंच्या मृत्यूसंदर्भात हादरवणारं सत्य, मृतदेह अजूनही… युद्ध सुरू असतानाच जगात खळबळ!
GH News April 19, 2026 07:12 PM

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांच्या हत्येला जवळपास 50 दिवस झाले आहेत, मात्र त्यांच्या अंत्यसंस्काराबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. न्यूयॉर्क पोस्टने सादर केलेल्या एका अहवालानुसार, अधिकारी यामागे सुरक्षा कारणे आणि लॉजिस्टिक अडचणी असल्याचे सांगत आहेत. असं मानलं जात आहे की इराणी अधिकारी मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांशी संबंधित धोके तपासत आहेत. संभाव्य इस्रायली हल्ल्यांचा धोका असल्याने अंत्यसंस्कार करण्याचत आलेले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.

याबाबत फाउंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रसीजचे बेहनाम तालेब्लू यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत सरकार ही प्रक्रिया पुढे नेण्यास तयार नाही. सरळ शब्दांत सांगायचे तर, इराणमधील सत्ताधारी इतके घाबरलेले आणि कमकुवत आहेत की ते कोणताही धोका पत्करू शकत नाहीत.’ याच कारणामुळे आतापर्यंत अंत्यसंस्कार होऊ शकले नाही अशी माहिती समोर आली आहे.

अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यात खामेनेईंचा मृत्यू

इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर अयातुल्ला अली खामेनेई यांचा 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला होता. यानंतर इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र झाला होता. खामेनेई यांच्या निधनानंतर अद्याप त्यांना अंतिम निरोप देण्यात आलेला नाही. याआधी 1989 मध्ये अयातुल्ला रूहोल्लाह खुमैनी यांच्या निधनानंतर तेहरानमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते, ज्यात लाखो लोक सहभागी झाले होते.

अंत्यसंस्काराचे ठिकाण ठरवण्याची प्रक्रिया सुरू

काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खामेनेई यांच्या मृत्यूनंतर 1989 सारखा मोठा कार्यक्रम अद्याप आयोजित करण्यात आलेला नाही. हवाई हल्ले आणि अस्थिर परिस्थितीमुळे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र जमलेले नाहीत. तालेब्लू यांनी सांगितले की सरकारला अंतर्गत असंतोष आणि माहिती नियंत्रणाबाबतही चिंता आहे, त्यामुळेच याला उशिर होत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, इराणी अधिकारी मशहद शहराला खामेनेई यांच्या अंत्यसंस्कारासाठी संभाव्य ठिकाण म्हणून विचार करत आहेत, कारण तेथील सुरक्षा व्यवस्था करणे तुलनेने सोपे ठरू शकते.

इराणी सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, याआधी 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या तीन दिवसांच्या राजकीय अंत्यसंस्काराच्या प्राथमिक योजनेला रद्द करण्यात आले होते, कारण अमेरिका आणि इस्रायलने या काळात हल्ले तीव्र केले होते. त्यानंतर आतापर्यंत अंत्यसंस्काराची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.