Team India : श्रेयस अय्यर सूर्याची जागा घेणार;भारताचा कर्णधार बदलणार?
GH News April 19, 2026 11:11 PM

भारतात आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमाची (IPL 2026) रंगत पाहायला मिळत आहे. प्रत्येक संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी लढत आहे. अशात आयपीएल दरम्यान टीम इंडियाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. टी 20i टीम इंडियाचा कॅप्टन बदलणार असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. सूर्यकुमार यादव सध्या टीम इंडियाचा टी 20i कॅप्टन आहे. मात्र टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज श्रेयस अय्यर हा कॅप्टन म्हणून सूर्यकुमार यादव याची जागा घेणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने टीम इंडियाचा टी 20i कर्णधाराबाबतचं वृत्त दिलं आहे. टीओआयनुसार, सूर्याच्या जागी श्रेयसला कॅप्टन करण्याबाबत चर्चा सुरु आहे.

टीम इंडियात हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडूही आहेत ज्यांना नेतृत्वाचा तगडा अनुभव आहे. मात्र श्रेयसचंच नाव आघाडीवर असण्यामागे कारण आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. श्रेयसने कॅप्टन म्हणून आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. श्रेयसने त्याच्या नेतेत्वात दिल्लीला 2020 साली अंतिम फेरीत पोहचवलं होतं. याच श्रेयसने केकेआरला 2024 साली आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली होती. तर श्रेयसच्या नेतृत्वात पंजाब किंग्स 2025 साली उपविजेता ठरली होती. इतकंच नाही, श्रेयसने नेतृत्वाच्या जबाबदारीसह फलंदाजीतही कमाल केली आहे. सध्या श्रेयस पंजाबचंच नेतृत्व करत आहे.

तसेच श्रेयसची आयपीएल स्पर्धेत यशस्वी कर्णधार म्हणून सर्वाधिक टक्केवारी आहे. कॅप्टन म्हणून श्रेयसची टक्केवारी ही 61 टक्के इतकी आहे. श्रेयस याबाबत महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मापेक्षाही सरस आहे.

टीओआयच्या रिपोर्ट्सनुसार, निवड समिती कॅप्टन बदलण्याच्या विचारात असल्यास ते श्रेयस अय्यर याचा विचार करु शकतात. तसेच निवड समिती श्रेयसचा चौथ्या स्थानी फलंदाजीसाठीही विचार करु शकतात. त्यामुळे सूर्याच्या जागेसाठी श्रेयस प्रबळ दावेदार आहे.

श्रेयस सध्या टी 20I टीम इंडियाचा भाग नाही. श्रेयसने अखेरचा टी 20I सामना 3 वर्षांआधी खेळला होता. श्रेयस 2023 साली टी 20I टीमचा भाग होता. त्यामुळे निवड समिती 3 वर्षांपासून बाहेर असलेल्या श्रेयसला संधी देणार की कर्णधार म्हणून पहिल्याच फेरीत टीम इंडियाला टी 20I वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या सूर्यकुमारवर विश्वास दाखवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.