Shaktipeeth Highway Protest: वाळवा तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकरी एकवटले
esakal April 20, 2026 01:45 AM

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : संभाव्य शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकरी एकवटताना दिसत आहेत. या महामार्गाच्या विरोधात भूमिका निश्चित करण्यासाठी वाळवा तालुक्यातील शेतकरी शनिवार (ता. २५) सकाळी ११ वाजता राजारामबापू नाट्यगृह येथे एकत्र येणार आहेत. शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने या मेळाव्याचे आयोजन केले आहे.

वाळवा तालुक्यातून प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग हा स्थानिकांच्या कोणत्याही मागणीशिवाय लादण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. सहकारी उपसा जलसिंचन योजनांद्वारे कोट्यवधींची गुंतवणूक करून सुपीक बनविलेल्या जमिनी या महामार्गामुळे बाधित होणार असल्याची भीती आहे. वारणा आणि कृष्णा नदीच्या पूरपट्ट्यातील गावांसाठी या महामार्गाच्या भरावामुळे पूरस्थितीचा धोका वाढणार असून पावसाचे पाणी साचून जमिनी क्षारपड होण्याची शक्यता आहे. याशिवाय पानंद रस्ते, ऊस वाहतूक, गावांमधील दळणवळण, शैक्षणिक संस्था, दूध संस्था, साखर कारखाने आणि स्थानिक बाजारपेठांवरही या प्रकल्पाचा विपरीत परिणाम होणार आहे. परिणामी शेतकरी, शेतमजूर आणि संबंधित सर्व घटकांचे जनजीवन विस्कळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

शेतकऱ्यांच्या मते, शक्तीपीठ महामार्गामुळे दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजा पूर्ण करण्यास अडथळे निर्माण होणार आहेत. दुध वाहतूक, वैरण ने-आण, लहान वाहनांची वाहतूक यावरही निर्बंध येऊ शकतात.

"वाळवा तालुक्यात महामार्ग करण्यापेक्षा शासनाने पानंद रस्ते, आरोग्य सुविधा, एसटी सेवा आणि मराठी शाळा या मूलभूत गरजांकडे प्राधान्य द्यावे. वाळवा तालुक्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करून पर्यायी मार्गांचा विचार करावा. आमची संघर्ष समिती हा मार्ग होऊ देणार नाही."

-बी. जी. पाटील, संघर्ष समितीचे निमंत्रक

संभाव्य शक्तीपीठ महामार्गाबाबत कृष्णा नदीकाठावरील मसुचीवाडी ते वारणा नदीकाठावरील ऐतवडे खुर्दपर्यंतच्या शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कृष्णा नदीच्या साटपेवाडी ते मसुचीवाडी मध्यवर्ती भागातून तालुक्यात हा मार्ग प्रवेश करेल. जुनेखेड-नवेखेडच्या पश्चिम बाजूने पुढे येऊन ईश्वरपूर-सांगली रस्त्यास प्रकाश हॉस्पिटलजवळ छेदेल. तेथून पुढे तुजारपूरच्या पश्चिम बाजूने कामेरी-येडेनिपाणीच्या शिवारातून आशियाई महामार्गावरील येडेनिपाणी फाट्याच्या उत्तरेस छेदून इटकरे येथील तुकाई मंदिर खोऱ्यातून येलूरच्या पश्चिम बाजूने व कुरळप-ऐतवडे खुर्दच्या पूर्व शिवारातून पारगाव (ता. हातकणंगले) येथील वारणा नदीवर जाईल, असा अंदाज आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.