Record Broken! पंजाब किंग्सने नोंदवली IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्या; प्रियांश आर्य, कूपर कॉनलीसह सारेच लखनौच्या गोलंदाजांवर तुटून पडले...
esakal April 20, 2026 01:45 AM

Punjab Kings vs Lucknow Super Giants marathi Updates: पंजाब किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील सर्वोच्च धावसंख्या आज उभी केली. लखनौ सुपर जायंट्सच्या गोलंदाजांची धु धु धूलाई करून PBKS ने धावांचा डोंगर उभा केला. पहिल्या षटकात विकेट गेल्यानंतरही प्रियांश आर्य ( Priyansh Arya ) व कूपर कॉनली ( Cooper Connolly ) यांच्या १८२ धावांच्या विक्रमी भागीदारीने LSGच्या गोलंदाजांना हतबल केले. त्यामुळेच जेव्हा हे दोन्ही फलंदाज बाद झाले, तेव्हा मालक संजीव गोएंका यांनी देवाचे आभार मानत छातीवर हात ठेवला.

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात प्रभसिमरन सिंग ( ०) याला माघारी पाठवले होते. पण, प्रियांश व कॉनली यांनी तुफान फटकेबाजी केली. प्रियांशने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि हे त्याचे तिसरे अर्धशतक होते, की जे त्याने २० चेंडूंच्या आत पूर्ण केले. कॉनलीनेही २७ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. या दोघांनी स्टेडियमच्या सर्व कोपऱ्यात चेंडू भिरकावला आणि चाहत्यांचे मनोरंजन केले. जलदगती गोलंदाजांना चोप बसत असताना रिषभ पंतने एडन मार्करमचा फिरकी पर्याय वापरला आणि त्या षटकात दोघांनी ३२ धावा कुटल्या.

PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत

या आयपीएलमधील हे सर्वात महागडे षटक ठरले. LSG च्या गोलंदाजाने आयपीएल इतिहासात टाकलेले हे महागडे षटक ठरले. यापूर्वी २०२२ मध्ये एलिमिनेटर सामन्यात RCB विरुद्ध रवी बिश्नोईने २७ धावा दिल्या होत्या. कॉनली आणि प्रियाश यांची ८० चेंडूंत १८२ धावांची भागीदारी प्रिंस यादवने मोडली. कॉनली ४६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकारांसह ८७ धावांवर झेलबाद झाला. प्रियांश ३७ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांसह ९३ धावांवर बाद झाला.

पंजाबकडून १५० हून अधिक धावांची ही तिसरी सर्वोत्तम भागीदारी ठरली. अॅडम गिलख्रिस्ट व शॉन मार्श यांनी २०११ मध्ये बंगळुरूविरुद्ध २०६ आणि लोकेश राहुल व मयांक अग्रवाल यांनी २०२० मध्ये राजस्थानविरुद्ध १८३ धावा जोडल्या होत्या. आज कॉनली व प्रियांश यांनी १८२ धावा जोडल्या. कर्णधार श्रेयस अय्यर ( ५) आज स्वस्तात माघारी परतला. नेहाल वढेराही ७ चेंडूंत १३ धावा करून माघारी परतला. मार्कस स्टॉयनिस व शशांक सिंग यांनी शेवटच्या षटकांत चांगल्या धावा चोपल्या.

PBKS vs LSG Live: १२ चौकार, १६ षटकार... प्रियांश आर्य, कूपर कॉनली यांचे शतक थोडक्यात हुकले, संजीव गोएंका यांनी मानले देवाचे आभार...

मार्कस स्टॉयनिस व शशांक सिंग यांनी शेवटच्या षटकांत चांगल्या धावा चोपल्या. या दोघांनी १७ चेंडूंत ४४ धावा जोडल्या. शशांक ६ चेंडूंत १ चौकार व २ षटकारांसह १७ धावांवर झेलबाद झाला. पंजाबने ७ बाद २५४ धावा केल्या आणि त्यांनी RCB चा विक्रम मोडला. या आयपीएलमध्ये RCB ने ३ बाद २५० धावा ( vs CSK) चोपून आयपीएल २०२६ मधील सर्वोत्तम धावांचा विक्रम नोंदवला होता. तो आज पंजाब किंग्सने मोडला आणि आयपीएल इतिहासातील ही पंजाबची दुसरी सर्वोत्तम धावसंख्या ठरली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.