नालासोपाऱ्यात कारचा भीषण अपघात, अनियंत्रित कार कोसळली थेट विहीरीत, अग्निशमन दलाची टीम दाखल
Nalasopara Accident News : नालासोपारा (Nalasopara) पूर्वेतील वालई पाडा परिसरात आज एक धक्कादायक अपघाताची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास एक कार थेट विहीरत कोसळल्याची घटना घडली आहे. संतोषी माता मंदिराजवळून जाणारी सेंट्रो कार अचानक अनियंत्रित होऊन विहिरीत कोसळली. या अपघातात कारमधील दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या आचोले अग्निशमन केंद्राची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी आपला जीव धोक्यात घालून बचावकार्य केलं आहे.
अग्निशामक जवानांनी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरुन दोन्ही जखमींना काढलं बाहेर
प्रमुख अग्निशमन अधिकारी किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. शिडी (लॅडर) आणि सुरक्षा बेल्टच्या सहाय्याने अग्निशामक जवानांनी जीव धोक्यात घालून विहिरीत उतरुन दोन्ही जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढले आहे. सुदैवाने या घटनेत मोठी जीवितहानी टळली असून, जखमींना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. नागरिकांनी अग्निशामक दलाच्या तत्पर कामगिरीचे कौतुक केले आहे.
कालव्यात कार कोसळून पाच जण गंभीर जखमी, नांदेडमध्ये धक्कादायक घटना
नांदेड जिल्ह्यातही भीषण अपघाताची एक घटना घडली आहे. एका अरुंद पुलावरुन कार कालव्यात कोसळल्याची घटना घडली आहे. या
अपघातात पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मानार प्रकल्पाच्या कौठा-गडगा या रस्त्यावरच्या अरुंद अन धोकादायक पुलावर हा
अपघात झाला आहे. अरुंद पूल असल्यामुळे कार चालकाला संतुलन राखता आले नसल्याने हा
अपघात घडलाय. यावेळी स्थानिकांनी तातडीने बचावकार्य राबवत जखमींना रुग्णालयात हलवले. याच पुलावर यापूर्वी अनेकदा
अपघात झाले आहेत मात्र तरीही पुलाच्या रुंदीकरनाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलय. त्यामुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सायन-पनवेल हायवेवर पाच ते सहा गाड्या एकमेकांना घडकल्या, सुदैवाने कोणाला गंभीर दुखापत नाही
सायन - पनवेल हायवेवर खारघर येथे गाड्यांचा अपघात झाला होता. पाच ते सहा कार एकमेकांना थडकल्या होत्या. या अपघातात गाड्यांचे नुकसान झाल्याचे दिसून आले. सुदैवाने यात कोणाला गंभीर दुखापत झाली नाही. पनवेल जाणाऱ्या मार्गीकेवर हा अपघात झाला होता. खारघर येथे अपघात झाल्याने काही काळ वाहतूक जाम झाली होती. मात्र पोलिसांनी अपघात झालेली वाहणे बाजूला केल्याने वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणी कोणावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.