अशोक खरातचा नवा कारनामा उघड,एकाच व्यक्तीच्या नावे 32 बनावट खाती उघडून 57 लाखांची अफरातफर; आणखी एक गुन्हा दाखल
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा April 21, 2026 12:43 PM

Ashok Kharat Crime News: स्वतःला आध्यात्मिक गुरु म्हणवून घेणाऱ्या आणि महिलांच्या लैंगिक शोषणाचे अनेक गुन्हे अंगावर असलेल्या भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) अडचणीत दिवसागणिक वाढ होत आहे. आता सिन्नर येथील जगदंबा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेत तक्रारदाराच्या नावावर 32 बनावट खाती उघडून तब्बल 57 लाख 90 हजार 979 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी अशोक खरात आणि पतसंस्था व्यवस्थापनावर नवा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat Crime News: नेमके प्रकरण काय?

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 2016 ते 2023 या कालावधीत हा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. तक्रारदाराच्या संमतीशिवाय त्यांच्या नावाचा वापर करून पतसंस्थेत चक्क 32 बनावट खाती उघडण्यात आली होती. या खात्यांच्या माध्यमातून 57 लाखांहून अधिक रुपयांची अफरातफर करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी अशोक खरातसह पतसंस्थेच्या व्यवस्थापनावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Ashok Kharat Crime News: ED नेही चौकशीचा फास आवळला

काही दिवसांपूर्वीच सक्तवसुली संचालनालयाने (ED) जगदंबा पतसंस्थेवर छापा टाकून मोठी चौकशी केली होती. अशोक खरातने केवळ शारीरिक शोषणच केले नाही, तर भाविकांची फसवणूक करून कोट्यवधींचे आर्थिक साम्राज्य उभे केले आहे. ईडीने आता या प्रकरणात मनी लाँड्रिंगचा (Money Laundering) गुन्हा दाखल केला असून, नाशिक पोलिसांकडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.

Ashok Kharat Crime News: पोलीस कोठडीत वाढ

दरम्यान, महिला अत्याचाराच्या पाचव्या गुन्ह्यात विशेष तपास पथकाने (SIT) खरातला 19 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर खरातला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आता एकापाठोपाठ एक आर्थिक घोटाळे समोर येत असल्याने खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Ashok Kharat Crime News: अशोक खरात प्रकरणाचा घटनाक्रम

17 मार्च : रात्री अकरा वाजता भोंदू अशोक खरातला अटक. 

18 मार्च: भोंदू अशोक खरातला नाशिक न्यायालयात केले हजर; सात दिवसांची पोलीस कोठडी. 

19 मार्च : भोंदू अशोक खराच्या फोकस कार्यालयावर छापा. 

20 मार्च: विशेष तपास पथकाकडे प्रकरण वर्ग.

21 मार्च: महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचा आयोगाचा अध्यक्ष पदाचा राजीनामा.

22 मार्च : तीन महिलांच्या तक्रारीनंतर खरात वर गुन्हे दाखल.

23 मार्च: न्यायालयात पुन्हा सुनावणी साठी केले हजर 

24 मार्च: नाशिक पोलीस आयुक्त सह पथकाचे विधिमंडळात अभिनंदन / निवेदन.

25 मार्च: धार्मिक भावना दुखावणे आणि, अमली पदार्थांचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हे वाढवले.

26 मार्च: पाच कोटी रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी खरातवर फसवणुकीचा गुन्हा दाखल.SIT कडून पुरावे जप्त.

27 मार्च: भोंदू अशोक खरातचे ओकस कार्यालय सील.

28 मार्च: नेवासातील कापड व्यावसायिकाला खोट्या अंगठ्या दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल.

30 मार्च: न्यायलात हजर आणि तिसऱ्या गुन्ह्यात पुन्हा पोलीस कोठडी.

31 मार्च: कार्यालयासह निवासस्थानी झडती, कागदपत्र हस्तगत.

1 एप्रिल: मुलगा हर्षवर्धन ताब्यात मात्र रात्री उशिरा चौकशी करून सोडले.

2 एप्रिल: ऑफिस बॉय नेच धडा शिकवल्याचे निष्पन्न, प्रकरणाची व्याप्ती वाढली. 

3 एप्रिल: मरणाची भीती दाखवल्याप्रकरणी मिरगावची जमीन लुटल्याचे उघडकीस.

4 एप्रिल: पहिल्यांदा अशोक खरातला vc द्वारे न्यायालयात केले हजर ( पुन्हा पोलीस कोठडी)

8 एप्रिल: आठ महिला तक्रारी दाखल, तपासता महत्त्वाचे पुरावे SIT च्या हाती लागले.

13 एप्रिल: नाशिकपुणे आणि शिर्डी सह 11 ठिकाणावर एकाच वेळी ED चे छापेमारी.

15 एप्रिल: गरोदर महिलेवर अत्याचार आणि मुलगा होईल असा दावा केल्याप्रकरणी चौथ्या गुन्ह्यात 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी.

17 एप्रिल: ED कडून अशोक खरातच्या ओकस कार्यालयामध्ये झाडाझडती, शिवनीका संस्थानमध्ये असलेले उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांची पत्नी अनुराधा शेळकेचा अपघाती मृत्यू.

18 एप्रिल: चौथ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी. 

19 एप्रिल: पाचव्या गुन्ह्यात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी.

Ashok Kharat Crime News: खरात प्रकरणी तपासातील महत्त्वाच्या आणि धक्कादायक बाबी.

- भक्तांना घाबरवण्यासाठी वीस फुटाचा नाग रिमोट कंट्रोल ने फिरवत असल्याचा समोर. 
 
- अशोक खरात भक्तांना फसवण्यासाठी दुर्मिळ जडीबुटी आणि हरणाची कस्तुरी यांसह इतर वस्तूंचा वापर करून चमत्काराचा बनाव करत असल्याचा उघड. 

- अशोक खरातचे अनेक बडे नेते आणि अधिकाऱ्यांचे जवळचे संबंध असल्याचा उघड आणि त्या संदर्भातील काही फोटो व्हायरल. 

- अशोक खरातची पत्नी कल्पना अद्याप फरार अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न सुरू. 

- अशोक खरातच्या मालमत्तेची चौकशी सुरू असून पाचशे कोटीपेक्षा जास्त आकडा वाढण्याची शक्यता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.