जसप्रीत बुमराहला पहिलं षटक न देण्याचं कारण काय? हार्दिक पांड्याने उत्तर देत केली स्वत:ची पाठराखण
GH News April 21, 2026 10:12 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सने पहिल्याच सामन्यात विजय मिळवून 14 वर्षांचा पराभवाचा पायंडा मोडून काढला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. पण सलग चार पराभवानंतर या आनंदावर विरजन पडलं. त्यात मुंबई इंडियन्सच्या काही खेळाडूंचा फॉर्म हा चिंतेचा विषय होता. खासकरून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एकही विकेट न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होतं. सलग पाच सामन्यात त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण गुजरात टायटन्सविरुद्धच्या सहाव्या सामन्यात त्याला यश मिळालं. या सामन्यात कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या हातात पहिलं षटक सोपवलं होतं. पहिल्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने साई सुदर्शनची विकेट काढली. या विकेटसह त्याने पाच सामन्यातील विकेट दुष्काळ संपुष्टात आणला. पहिलं षटक सोपल्याने फायदा झाला असं क्रिकेटप्रेमींचं म्हणणं होतं. पण हार्दिक पांड्याने आपल्या निर्णयाची पाठराखण करत पहिलं षटक का देत हे सांगितलं.

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘ही खूपच रंजक गोष्ट आहे. मी पाहतो की बरेच लोक विचारतात की जस्सीला सुरुवातीला गोलंदाजी का दिली जात नाही, पण त्याने 140 हून अधिक सामन्यांमध्ये फक्त 7 किंवा 8 वेळाच पहिले षटक टाकले आहे. त्यामुळे ही हार्दिक पांड्याची समस्या नाही, तर ही सर्वांचीच समस्या आहे. कारण बुमराह इतका खास आहे की तुम्हाला त्याला नंतरच्या षटकांमध्ये खेळवायचे असते.’ आता पुढच्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या हाती पहिलं षटक सोपवणार की नाही हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील दुसऱ्या विजयानंतर मुंबई इंडियन्सने सातव्या स्थानी झेप घेतली आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ शेवटच्या स्थानावर होता. मात्र आता चेन्नई सुपर किंग्स, लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांना मागे टाकत सातवं स्थान गाठलं आहे. मुंबई इंडियन्सचे 8 सामने शिल्लक आहेत आणि प्लेऑफमध्ये जागा मिळावायची असेल तर 8 पैकी 6 सामने जिंकणं भाग आहे. मुंबई इंडियन्सचा पुढचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे. हा सामना 23 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सशी वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.