पंचवटी - सिगारेट मागितली असता ती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पंचवटीत पेठ रोडवर २७ वर्षीय तरुणाची चॉपरने वार खून करण्यात आला. राहुल कृष्णा राऊत (रा. नवनाथ नगर ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (ता.१८) रात्री साडेनऊला ही घटना घडली.
राहुल राऊत हा आपल्या टिल्लू पवार आणि सुनील गुंजाळ या मित्रांसह नवनाथ नगरमधील साईबाबा मंदिराजवळ बसलेला होता. यावेळी संशयित रोहिदास वामनराव आहेर (वय २६, रा. नवनाथ नगर) तेथे आला. त्याने राहुलकडे सिगारेटची मागणी केली. मात्र, राहुलने सिगारेट देण्यास नकार दिला. या रागातून संशयित रोहिदासने आपल्या जवळील चॉपरच्या राहुलवर हल्ला केला. हल्ल्यात राहुल जखमी झाला असता त्यास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
घटनेची माहिती कळताच पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, साहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. उपचार सुरू असताना सोमवारी (ता.२०) पहाटे दोनला राहुलचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कृष्णा हरी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
संशयित सराईत गुन्हेगार
मृत राहुलवर हल्ला करणारा रोहिदास आहेर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी पंचवटी पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात घरफोडी, मारामारी व दहशत माजवल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.