ढिंग टांग : शिकारीची तयारी..! (एक रोमांचक अरण्यकथा...)
esakal April 22, 2026 07:45 AM

अरण्यकथेतल्या कुठल्याही सकाळीप्रमाणे एक सकाळ. नेहमीप्रमाणे नेपतीच्या झुडपात खसफस झाली. वाघाचे मुस्कट दिसू लागले. त्याची चाहूल लागताच सातबायांचा कलकलाट करणारा थवा भुर्रकन दुसरीकडे उडून गेला, आणि पुन्हा कलकलाट करू लागला. पाठवठ्याजवळ अर्जुनाच्या वृक्षावर टपून बसलेल्या मत्स्यगरुडाने मच्छीमारीचा नाद सोडून झाडावरच एखादी पालबिल मिळते का, ते पाहू लागला. पाठवठ्यातली ब्राह्मणी बदके आणि हुदाळे पाण्यात बुडाली. (खुलासा : हे दोन्ही प्राणी प्रस्तुत लेखकाने कधीही पाहिलेले नाहीत. पण अरण्यकथेत असतात म्हणून इथेही आहेत.) पलीकडच्या पाषाणावर बसलेले बिबट निमूटपणाने उठून गेले. सांबरांचा कळप उधळला. शेवरीच्या झाडावरल्या वानरांच्या टोळक्यात धावपळ झाली...हुश्श! येवढे सगळे एका वाघाच्या मुस्कटामुळे घडले.

पण समोरच्या मचाणावर ठाण मांडून बसलेल्या एका सुप्रसिद्ध शिकारी-कम-फोटोग्राफरने मात्र आपली जागा सोडली नाही. शिकाऱ्यासोबत त्याचा छोकरा, छोटा शिकारीही होता.

‘‘बॅब्स, वाघ कुठाय?’’ छोट्या शिकाऱ्याने विचारले. नेपतीच्या झुडपात काहीच धड दिसत नव्हते. पिवळे-काळे काहीतरी दिसले न दिसले. मोहाच्या झाडापासून पंधरा कदमांवर दक्षिणेला आणि पाणवठ्यापासून वीस कदमांवर नैऋत्येला वाघ आहे, हे छोट्या शिकाऱ्याला कसे सांगायचे, हे मोठ्या शिकाऱ्याला कळेना. लोकेशन सांगणे अवघड गोष्ट असते. आपले राज्य आले की वाघांमध्ये चिप घालून ‘जीपीएस’द्वारे त्यांचे लोकेशन शोधण्याची योजना राबवण्याचे मोठ्या शिकाऱ्याने मनोमन ठरवले.

मोठा शिकारी हा खरोखर मोठा होता किंवा आहे. वाघांमध्ये त्याचा दबदबा आहे. बंदुकीऐवजी मोठा शिकारी क्यामेऱ्याने सावज टिपतो. त्याच्याकडून फोटो काढून घेण्यासाठी भले भले तालेवार वाघ अडीच-अडीचशे किलोमीटरची जंगले पार करून फोटोसेशनसाठी येतात, असे सांगितले जाते. पण हल्ली मोठा शिकारी फारसा घराबाहेर पडत नाही. वाघच त्याच्या बांदऱ्याच्या स्टुडिओत येतात, आणि फोटो काढून घेऊन जातात. (खुलासा : वन अवर फोटो स्टुडिओ. पासपोर्ट साइज २४ फोटो काढून एका तासात मिळतील.) पण हल्ली स्टुडिओदेखील बरा चाललेला नाही. काहीतरी करायला हवे, या विचाराने मोठा शिकाऱ्याचे मन अस्वस्थ होते. स्टुडिओ चालू लागला की छोट्या शिकाऱ्याच्या ताब्यात देऊन अरण्यात फोटो काढायला हिंडायचे, असे मोठ्या शिकाऱ्याचे स्वप्न होते. पण-

‘‘बॅब्स, तो बघा रानकोंबडा!’’ छो. शि. ओरडला.

‘‘गप्प बैस...कावळा आहे तो साधा!’’ मो. शि. कुजबुजला. हा कधी हाताशी येणार?, या प्रश्नाने मो. शि. चिंतित झाला.

‘‘बॅब्स, आपण वाघ पाळू या का?,’’ छो. शि. म्हणाला.

‘‘तू पाळ!’’ कौतुकाने डोक्यावर टप्पल मारत मो. शि. म्हणाला.

‘‘मला टायगर रायडिंग करायचंय!’’ छो. शि. उत्साहाने म्हणाला. बाळा, ते अवघड असते, हे मो. शि. सांगणार होता, पण त्याऐवजी त्याने फक्त सुस्कारा सोडला.

‘‘सगळीकडे अराजक माजलंय...आयपीएलसारख्या राजकारणात बोली लागत आहेत. वाघ विकले जातायत शेळीच्या भावात! तू लौकर मोठा हो, आणि सगळं हातात घे बरं!’’ मो. शि. भावनाविवश झाला. मचाणावरचे वातावरण इमोशनल झाले. पलीकडच्या फांदीवर कुठला तरी पक्षी दु:खी आवाजात चिरकत होता...

‘‘चालेल! डन!! मी बघतो सगळं बॅब्स! डोण्ट वरी!!’’ छो. शिकाऱ्याने कर्तृत्ववान आवाजात आश्वासन दिले.

‘‘चला, तयारीला लागा!’’ मो. शि. म्हणाला.

चला, चला निघूया!’’ छो. शि. घाई करू लागला.

...पण पंचाईत आली! मचाणावर चढताना शिडी होती, उतरताना नाही! आता काय करायचे अं? मचाणावरुन उतरायचे कसे हे न कळल्यामुळे बराच वेळ ते नेपतीच्या झुडपाकडे टक लावून बघत राहिले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.