राज्यरंग - राजस्थान : 'सार्थक नाम अभियान' ठरले निरर्थक
esakal April 22, 2026 09:45 AM

किशोर जामकर

सरकारने नको तिथे नाक खुपसले की ते कसे कापले जाते, याचा उत्तम नमुना राजस्थानमध्ये दिसून आला. राज्यातील सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची अर्थहीन आणि कालबाह्य नावे बदलून त्यांना नवी ओळख देण्याच्या उदात्त उद्देशाने सुरू करण्यात आलेले ‘सार्थक नाम अभियान’ वादानंतर अखेर मागे घेण्यात आले आहे. शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी जाहीर केलेली ही महत्त्वाकांक्षी योजना कोणतेही कारण न देता रद्द करण्याची नामुष्की सरकारवर यामुळे ओढवली आहे. एखाद्या उपक्रमाचा सरकारी बाबूगिरीत कसा गळा आवळला जातो याची ही रंजक कथा आहे.

या प्रकरणात सरकारची नाचक्की कशी आणि का झाली हे समजून घेण्याआधी सर्वप्रथम हे अभियान काय होते, हे जाणून घ्यावे लागेल. राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी एक पत्रकार परिषद घेत या अभियानाची घोषणा मोठी वाजतगाजत केली. राज्याच्या सरकारी शाळांमधील जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांची नावे निरर्थक वा विचित्र असल्याचे आढळून आल्याने हे अभियान हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शाळेतील हजेरीपटात मुलांची शेरू, शैतान, कालू अशी विचित्र नावे असल्याचे विभागाला आढळून आले. यातील अनेक नावे काही नावे जाती दर्शविणारी, काही अपमानजनक तर काही कालबाह्य होती. यातून ‘सार्थक नाम अभियाना’चा उदय झाला.

शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ‘नाव’ हे व्यक्तीच्या आत्मविश्वासाचे आणि सामाजिक प्रतिमेचे प्रतीक असते. अर्थहीन नावे मुलांमध्ये हीन भावना निर्माण करतात. त्यामुळे ही नावे बदलून विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि आशयघन नावे देण्यासाठी या अभियानाची घोषणा करण्यात आली. अर्थहीन नाव बदलल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि त्यांना नावावरून टोमणे ऐकावे लागणार नाहीत, असा दावा दिलावर यांनी केला. हे अतिशय सकारात्मक पाऊल असल्याचे सांगत शिक्षक आणि शाळेतील कर्मचारी पालकांशी संवाद साधून त्यांना उत्तम नावाचे महत्त्व समजावून सांगतील. पालक शिक्षण विभागाच्या यादीतून नाव निवडू शकतात वा आपल्या पसंतीचे इतर कोणतेही अर्थपूर्ण नाव ठेवू शकतात, असा पर्यायही त्यांनी ठेवला होता. मात्र, हा ‘संस्कार’ देण्याचा विचार लगोलग प्रशासकीय गोंधळात अडकला. आता शिक्षण सोडून नाव बदलण्याच्या कागदोपत्री प्रक्रियेत वेळ घालवायचा का? असा प्रश्न शिक्षकांनी प्रारंभी उपस्थित केला. हे अभियान सार्थकी लावण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेत मुलामुलींच्या पर्यायी नावांची यादी जाहीर केली आणि एकच गहजब उडाला.

२९०० नावांची यादी

शिक्षण खात्याने सुचविलेल्या नावांच्या यादीत प्रत्यक्षातील नावांपेक्षाही अधिक विचित्र नावांचा समावेश होता. यावर कडी म्हणजे शिक्षण विभागाने ‘एआय’ची मदत घेत पर्यायी नावांची यादी तयार केल्याचे सांगण्यात आले. मात्र, मुलांच्या नावाच्या यादीत दहीभाई, दगडूराम, दमास, अहंकार, बेचारादास, मख्खनसिंह अशी अधिक विचित्र आणि हास्यास्पद नावे होती. तर मुलींच्या यादीत भीक्षा, ऊर्जा, प्राप्ती, रजनीगंधा अशी नावे आढळून आली. सोबतच काही नावांची पुनरावृत्ती झाली होती. यातील काही नावे तर अशी होती की त्यांचा ना अर्थ लागत होता ना ऐकायला चांगली वाटत होती. यामुळे पालक आणि सामाजिक संघटनांनी विभागाच्या निष्काळजीपणावर टीकेची झोड उठवली. अभियानाची घोषणा होताच शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे मुलामुलींची अंदाजे २९०० नावांची यादी तयार केली. यातील नावे निवडल्याने मुलांना एक व्यक्तिमत्त्व आणि संस्कार मिळेल, असाही दावा करण्यात आला. परंतु, ‘एआय’ आणि शिक्षण विभागाच्या ‘जुगलबंदी’तून तयार झालेल्या यादीतील नावांमध्ये भयंकर, गंगोत्री, बिकानेर, मख्खी, अहित अशा ‘भयंकर’ नावांचा समावेश असल्याचे दिसून आले. ही यादी आणि यासंदर्भातील आदेश जाहीर होताच पालक संघटनांकडून तीव्र विरोध सुरू झाला. अपत्याचे नाव ठेवणे हा पूर्णपणे कुटुंबाचा वैयक्तिक अधिकार आहे. सरकारी विभागाला कोणाचे नाव अर्थहीन ठरवण्याचा अधिकार नाही, असे म्हणत पालकांनी यास विरोध सुरू केला. विरोध वाढताच शिक्षण विभागाने ही यादी अधिकृत नाही असे पठडीतील स्पष्टीकरण देत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत विरोधाने चांगली गती पकडली होती. यादीत काही चुका असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील, असेही विभागाकडून सांगण्याचा प्रयत्न झाला. त्याकडे कुणी लक्ष दिले नाही.

वाद हाताबाहेर गेल्याचे बघून सरकारी खाक्यानुसार शिक्षणमंत्र्यांनी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पुढे केले. अखेर अतिरिक्त मुख्य सचिव राजेश यादव यांनी आदेश देत हे अभियान रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ‘सार्थक नाम अभियाना’चा आदेश मागे घेण्यात आला असून, पालकांना मुलांच्या नावाबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य आहे, असे त्यांनी सांगितल्यामुळे हे अभियान घाईघाईत गुंडाळण्याची नामुष्की सरकारवर ओढवल्याचे जनतेपुढे आले. अशाप्रकारे सरकारची भरपूर नाचक्की करणाऱ्या या रंजक कथानकाची इतिश्री झाली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.