आजपासून विद्यार्थ्यांना तर २ मेपासून शिक्षकांना उन्हाळा सुट्टी! जनगणनेच्या प्रशिक्षणालाही आजपासून प्रारंभ, शिक्षकांना मिळणार विशेष रजा, वाचा...
esakal April 22, 2026 10:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : इयत्ता पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा उद्या (बुधवारी) संपणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांची उन्हाळा सुट्टी सुरू होईल. १ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर २ मेपासून शिक्षकांची उन्हाळा सुट्टी सुरू होणार आहे.

१५ जूनपासून सुरु होणाऱ्या शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस विद्यार्थ्यांना अध्यापन व्हावे, असे अपेक्षित आहे. मात्र, मार्च महिन्यातच शाळांकडून विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा उरकली जात होती. त्यामुळे २०० दिवस देखील अध्यापन होत नसल्याची बाब ओळखून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) २०२४-२५ पासून अंतिम सत्र परीक्षा एप्रिलमध्येच घेण्याचे आदेश काढले. त्यानुसार यंदाही ११ एप्रिलपासून अंतिम सत्र परीक्षेला सुरवात झाली.

उद्या (बुधवारी) परीक्षेचा शेवटचा पेपर आहे. त्यानंतर विद्यार्थी शाळेत येत नाहीत, उन्हाचाही तडाखा वाढला आहे. दरम्यान, ४४ दिवसांच्या उन्हाळा सुट्टीनंतर दरवर्षीप्रमाणे १५ जूनपासून शाळा सुरु होणार आहेत.

शिक्षकांना मिळेल विशेष रजा

आता शिक्षकांना आठ दिवसांत निकाल तयार करावा लागणार आहे. २ मेपासून शिक्षकांना १४ जूनपर्यंत उन्हाळा सुट्टी आहे, परंतु जनगणना व अभ्यासक्रम बदलाच्या प्रशिक्षणामुळे यंदा बहुतेक शिक्षकांना उन्हाळा सुट्टी मिळणार नाही. उद्यापासून (बुधवारी) जनगणनेसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जनगणनेमुळे ज्या शिक्षकांना उन्हाळा सुट्टी मिळणार नाही, त्यांना पुढे शासनाकडून तेवढ्या दिवसांची विशेष रजा मिळेल, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.