रंगभूमी गाजवणाऱ्या अतुल परचुरेंच्या नाटकाचं 20 वर्षांनी कमबॅक; दोन दिग्गज अभिनेते साकारणार मुख्य भूमिका
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 22, 2026 11:13 AM

Ae Bhau Doka Nako Khau Marathi Natak: अभिनयाची अचूक जाण आणि संवादांचे वेगवान टायमिंग ही आपली स्वतंत्र शैली जपणारे ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर (Veteran Actor Vinay Yedekar) आता एका नव्या आणि विशेष भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहेत. रॉयल थिएटर निर्मित आणि मिहिर गवळी (Mihir Gawali) यांची निर्मिती असलेल्या 'ए.. भाऊ डोकं नको खाऊ!' (Ae Bhau Doka Nako Khau) या नव्या कोऱ्या नाटकाचा शुभारंभ होत आहे. सातत्याने रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या विनय येडेकर (Vinay Yedekar) यांनी या नाटकासाठी खास वेळ काढण्यामागे एक अत्यंत जिव्हाळ्याचे कारण दडलेले आहे.

अतुल परचुरेंच्या आठवणी आणि मैत्रीचा ऋणानुबंध

या नाटकाची निवड करण्यामागचे मुख्य कारण सांगताना विनय येडेकर भावूक झाले. ते म्हणतात, "मी गेल्या काही काळापासून 'गेला माधव कुणीकडे' या नाटकाचे दौरे आणि मालिकांच्या चित्रिकरणात व्यग्र होतो. त्यामुळे नवीन नाटक हातात घ्यायला वेळ मिळत नव्हता. मात्र, जेव्हा या नाटकाची संहिता माझ्याकडे आली, तेव्हा ती नाकारणे शक्यच नव्हते. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, माझा जवळचा मित्र दिवंगत अभिनेते अतुल परचुरे याने ही भूमिका यापूर्वी अजरामर केली होती. अतुलने ज्या ताकदीने हे नाटक गाजवले, त्याच मंचावर त्याची आठवण जागवत ही भूमिका साकारणे, हा एक वेगळाच योग आहे."

विनय येडेकर पुढे सांगतात की, "तालमींच्या दरम्यान एखाद्या प्रसंगात अडकलो की, मी थोडा वेळ थांबतो आणि विचार करतो की, 'जर अतुल या जागी असता, तर त्याने हे कसं केलं असतं?' त्याच्या पावलावर पाऊल ठेवून हे नाटक करणे, हीच माझ्यासाठी त्याला खरी श्रद्धांजली आहे."

विनोदाची नवी जुगलबंदी आणि जुने ट्यूनिंग

दिग्दर्शक संतोष पवार यांनी या नाटकाची धुरा सांभाळली आहे. विनय येडेकर आणि संतोष पवार यांचे जुने ट्यूनिंग आणि कामाचा प्रदीर्घ अनुभव यामुळे संहितेतल्या विनोदाची अचूक पकड प्रेक्षकांना पाहायला मिळेल. त्यांच्या सोबतीला अभिनयाची वेगळी शैली असलेले आनंदा कारेकर इतर कलाकार मनोरंजनात अधिक रंग भरणार आहे.

तगडा नटसंच आणि तांत्रिक फळी

नाटकात विनय येडेकर आणि संतोष पवार यांच्यासोबत आनंदा कारेकर, सानिका शिंदे, सोनाली मगर, आदित्य गटे आणि संकेत बिवलकर या उत्साही कलाकारांची फळी आहे. नाटकाच्या तांत्रिक बाजू संदेश बेंद्रे (नेपथ्य), शीतल तळपदे (प्रकाश योजना), आशुतोष वाघमारे (संगीत) आणि हास्या पवार (वेशभूषा) यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. नितीन नाईक हे या नाटकाचे सूत्रधार आहेत.

शुभारंभाचे प्रयोग:

1 मे 2026 (शनिवार): रात्री 8.30 वाजता, यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई
2 मे 2026 (रविवार): दुपारी 4.00 वाजता, मीनाताई ठाकरे नाट्यगृह, बोरिवली, मुंबई

जमलं ! लोकप्रिय अभिनेत्रीची मालिकेतील हिरोसोबतचं जमली जोडी; राजकीय नेत्याशी जवळचा संबंध

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.