दीनायन : माझा आवडता वीररस
esakal April 22, 2026 09:45 AM

माझी आवडती भूमिका नाही; परंतु आवडता रस आहे; आणि तो म्हणजे वीररस. तो रस जेथे असेल ते काम मला फार आवडते. माझ्या स्वभावातच वीररस जास्त आहे. त्यामुळे माझ्या त्या स्वभावप्रकृतीची छाया मला ज्या ज्या भूमिकेत दिसते, तेथे तेथे माझे मन जास्त रमते. मला शृंगाररस आवडत नाही आणि करुणरस तर बिलकुलच आवडत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे, की मी त्या भूमिका मन लावून करणार नाही. सिंधूची भूमिका करताना मी प्रेक्षकांना रडविले आहे.

मा. दीनानाथ मंगेशकर

नटाला त्याची सर्वांत आवडती भूमिका कोणती, असे विचारले आणि त्याने अमुक एक भूमिका आवडती आहे, असे सांगितले तर तो तोंडदेखले काही तरी बोलतो, असेच मी म्हणेन. कारण नट म्हटला म्हणजे त्याने अमुक भूमिका आवडती आणि तमुक नावडती, असा भेदभाव मुळीच करता कामा नये. त्याचा अमुक एक खासगी स्वभाव आहे असे म्हटले तरी स्वभावाला अनुरूप भूमिका त्याला आवडती वाटली तर तो नट नव्हे, असे माझे मत आहे. नटाच्या खासगी स्वभावाचा रंगभूमीशी काहीच संबंध नाही. उलट कुलीन, दुर्जन, विनोदी, वीर, करुण वगैरे सर्व स्वभाववैशिष्ट्यांची कामे त्याला करता आली पाहिजेत.

असे नट माझ्या दृष्टीला जे आज दिसत आहेत ते म्हणजे गणपतराव बोडस, बालगंधर्व, दाते व कोल्हटकर हे चारच होत. ललितकलेतील फाटक हे एक नट आहेत; पण त्यांच्याखेरीज नाव घेणारा मराठी रंगभूमीवर आज नट नाही. गणपतराव जोशी हे या सर्वांचे केवळ गुरू आहेत. ‘राणा भीमदेवा’तील त्यांचे तेजस्वी काम पाहिल्यावर लगेच होणाऱ्या दुसऱ्या नाटकामधील त्यांचे काम पाहिले की, नुकताच पाहिलेला राणा भीमदेव तो हा नव्हे, असे प्रेक्षकांना वाटावे, इतका त्यांचा निरनिराळ्या भूमिका करण्यात पराकाष्ठेचा हातखंडा. तसा पराक्रमी नट अजून झालेला नाही. गडकरी मास्तर तर त्यांना उभे राहून टाळ्या देत. बसून टाळ्या देणे हे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे, असे ते म्हणत. चिंतोबा गुरव हे दुसरे तेजस्वी नट होते. ‘एकच प्याला' नाटकातील सुधाकराच्या कामात त्यांचा हात धरणारा आज नट नाही, असे मीच म्हणतो असे नव्हे, तर ज्यांनी ज्यांनी आमच्या कंपनीचे व दुसऱ्या कंपनीचे ते नाटक पाहिले आहे त्यांचा दृढ समज आहे. हे नाटक गंधर्व मंडळीने आम्हाला फक्त तीन वर्षे करू दिले; पण त्या नाटकावर आम्ही पाऊण लाख रुपये मिळविले. एवढ्यावरूनच त्याची लोकप्रियता दिसून येण्यासारखी आहे. पंढरपूरला तर एका खेळाला २२०० रुपये उत्पन्न झाले आणि थिएटरात मुंगी शिरण्याइतकीही जागा न राहिल्यामुळे लोक थिएटरच्या व आसपासच्या इमारतीच्या छतावर उभे राहिले. हे नाटक करण्याची परवानगी नंतर आमच्याकडून काढून घेण्यात आली; परंतु मुंबईसारख्या ठिकाणी गंधर्व मंडळीचे व आमच्या बलवंत मंडळीचे हेच नाटक शेजारशेजारच्या थिएटरात एकाच वेळी लावले तर आमच्या प्रयोगाला जास्त उत्पन्न होईल, असे मी आव्हान देतो.

माझ्या स्वत:च्या आवडत्या भूमिकांबद्दल म्हणावयाचे म्हणजे मला कोणतीच भूमिका आवडत नाही; पण सर्व भूमिका मी मन लावून करतो. माझी आवडती भूमिका नाही; पण आवडता रस आहे; आणि तो म्हणजे वीररस. तो रस जेथे असेल ते काम मला फार आवडते. माझ्या स्वभावातच वीररस जास्त आहे. नेहमीच्या बोलण्या-चालण्यातही मला कोणी जरा ‘अरे’ म्हटले तर मी त्याला ‘कारे’ म्हणून विचारीन. रस्त्यावर मारामारी पाहिली, की मला त्याचा राग येतो. त्यामुळे माझ्या त्या स्वभावप्रकृतीची छाया मला ज्या ज्या भूमिकेत दिसते तेथे तेथे माझे मन जास्त रमते. ‘रणदुंदुभी’ नाटकात वीररस आहे; पण माझ्या मनाप्रमाणे तो नाही. मला शृंगाररस आवडत नाही आणि करुणरस तर बिलकुलच आवडत नाही. पण याचा अर्थ असा नव्हे, की मी त्या भूमिका मन लावून करणार नाही. सिंधूची भूमिका करताना मी प्रेक्षकांना रडविले आहे. सिंधूचा दळणाचा प्रसंग पाहताना प्रेक्षकांच्या डोळ्यांतून टिपे गळत; पण मला मात्र मनातून हसू येई. कारण मला असे रडणे आवडत नाही. ‘एकच प्याला’ नाटकातले पहिले तीन अंक मी चांगलेच वठवी; नारायणराव (बालगंधर्व) पुढचे दोन अंक चांगले वठवितात. वीररसाच्या भूमिका मला जास्त आवडत असल्या, तरी जशी मी सिंधूची भूमिका मन लावून करीत असे, तशी लतिकेची व कालिंदीचीही भूमिका आवडीने करीत असे. किंकिणीची भूमिका तर मी उत्कृष्ट वठवीत असे. वीररस असला म्हणजे मग ती स्त्री भूमिका असो की पुरुष भूमिका असो, मला सारखीच प्रिय वाटेल, एवढेच त्याचे थोडक्यात सार.

केव्हा केव्हा काही नट पूर्वी गंभीर काम करण्यात निष्णात म्हणून नावाजले असतानाही एकदा विनोदी काम केल्यावर नंतर कायमचेच विनोदी नट म्हणून मानले गेले. अशांपैकीच गणपतराव बोडस व आमच्या कंपनीतील दिनकर ही जोडी आहे. दोघेही गंभीर कामे करण्यात यशस्वी झालेले; पण एकाने लक्ष्मीधराचे व दुसऱ्याने कामण्णाचे एकदा रूप घेऊन रंगभूमीवर प्रवेश केल्यावर त्यांच्या पाठीवर विनोदी म्हणून शिक्का मारला गेला. मी आतापर्यंत केलेले विवेचन सर्वांनाच पटेल असे नाही. यापूर्वी माझ्या गाण्याच्या बाबतीत असा आक्षेप घेण्यात आला होता की, मी गाताना स्वर लावून गात नाही; बेफाट ताना मारतो. उलट माझे असे म्हणणे आहे, की बाकीचे नट फार स्वर लावून गातात; त्यांना ताना मारताच येत नाहीत! स्वर हे जसे गाण्याचे एक अंग आहे तसे तान नाही की काय? मग एक गायक स्वर लावून गातो म्हणून चांगला व दुसरा फार ताना मारतो म्हणून वाईट, हा भेद का करावा? मला स्वर लावून गाता येत नाही, तर इतरांना ताना मारून गाता येत नाही, असे मी का म्हणू नये? छातीत दम असल्याशिवाय ताना मारणे सोपे नाही, हे अशा आक्षेपकांना मी सांगू इच्छितो. ‘मानापमाना’त धैर्यधराचे काम करू लागल्यापासून मी चांगला गाऊ लागलो, असे काही जणांना म्हणताना पाहून मला मोठे नवल वाटले. म्हणजे आज मी वीस-बावीस वर्षे गात होतो ते फुकटच का? माझ्याइतका गाण्याचा अभ्यास केलेले नट म्हणजे मास्तर कृष्णराव, सवाई गंधर्व आणि पटवर्धन हे तिघेच माझ्या दृष्टीसमोर आहेत. इतरांना मी असे आव्हान देतो, की चार निःपक्षपाती रसिकांपुढे त्यांचे व माझे गाणे करावे. मी एक चीज वीस मिनिटे म्हटल्यानंतर ती मला पुन्हा गाण्यास सांगावी; पूर्वीची एकही तान न घेता मी नवीन धाटणीने ती म्हणून दाखवितो. इतका वकुब दुसऱ्या कोणाच्या अंगात असेल तर त्यांनी मला तसे आव्हान द्यावे.

मला स्त्री भूमिका शोभत नाही, असे म्हणणाऱ्या आक्षेपकांचा आणखी एक वर्ग आहे. रंगभूमी हे अभिनय कसाला लावून पाहणारे स्थळ आहे. स्त्रिया जन्मतः स्त्रिया आहेत, ह्या एकाच आधारावर त्यांना रंगभूमीवर आणल्याने त्यांचे काम पाहण्यास आलेल्या प्रेक्षकांचे मन त्या कसे आनंदविणार? रंगभूमीवर येऊन त्या बालगंधर्वांइतके अस्सल स्त्रीचे काम करून दाखवतील काय? हा अभिनयाचा प्रश्न आहे. स्त्रियांचे कैवारी म्हणतील की, मी ह्या सुधारणेचा विरोधक आहे. खरोखरच माझा ह्या गोष्टीला तीव्र विरोध आहे. पण तशाच अभिनयनिपुण स्त्रिया रंगभूमीवर येत असल्या तर अवश्य याव्यात. मात्र, केवळ स्त्रीत्वाच्या लाभामुळे त्यांनी रंगभूमीवर येण्याचे साहस करू नये.

(पूर्वप्रसिद्धी ः ‘वसुंधरा’ ः एप्रिल १९३३)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.