डॉ. मिलिंद नाईक प्राचार्य, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला
मानवी व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार करताना पाश्चात्त्य मानसशास्त्र आणि भारतीय तत्त्वज्ञान या दोन्ही परंपरांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पाश्चात्त्य मानसशास्त्रात अब्राहम मॅस्लो यांनी मानवी गरजांची श्रेणी मांडली, तर भारतीय तत्त्वज्ञानात तैत्तिरीय उपनिषदाने पंचकोशांची संकल्पना दिली. या दोन्ही संकल्पना भिन्न असल्या तरी मानवी विकासाकडे सर्वांगीण दृष्टीने पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन समान आहे.
मॅस्लो यांच्या मते मानवी गरजांची सुरुवात शारीरिक गरजांपासून होते. अन्न, पाणी, झोप आणि विश्रांती या मूलभूत गरजा पूर्ण झाल्याशिवाय पुढील विकास शक्य होत नाही. ही कल्पना पंचकोशांतील अन्नमय कोश आणि प्राणमय कोशाशी संबंधित आहे. अन्नमय कोश शरीराचे पोषण आणि सुदृढता दर्शवतो, तर प्राणमय कोश शरीरातील जीवनशक्ती, श्वसन, पचन आणि ऊर्जावहनाशी संबंधित आहे. त्यामुळे या दोन्ही स्तरांमध्ये स्पष्ट साधर्म्य दिसते.
पुढील स्तरावर मॅस्लो सुरक्षा, स्थैर्य आणि सुरक्षिततेच्या गरजांवर भर देतात. ही अवस्था पंचकोशांतील मनोमय कोशाशी संबंधित मानता येते. त्यानंतर मॅस्लोने प्रेम, आपलेपणा, नाती आणि सामाजिक संबंध यांना महत्त्व दिले आहे, हा देखील मनोमय कोशाचाच भाग आहे. मनोमय कोशात भावना, विचार आणि संबंध यांचा विकास होतो, ज्यामुळे व्यक्तीचे मानसिक संतुलन आणि भावनिक परिपक्वता वाढते.
मॅस्लो यांच्या आत्मसन्मान या पायरीमध्ये स्वाभिमान, आत्मविश्वास, कर्तृत्व आणि सामाजिक मान्यता यांचा समावेश होतो. पंचकोशांच्या दृष्टीने ही अवस्था विज्ञानमय कोशाशी जोडता येते. विज्ञानमय कोश बुद्धी, विवेक, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता विकसित करतो. शाश्वत-अशाश्वत यातील भेद समजून घेणे आणि योग्य निर्णय घेणे ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. विज्ञानमय कोशामुळे स्व-परिचय होऊन आत्मसन्मान निर्माण होतो. विवेकपूर्ण विचार आणि निर्णयक्षमतेमुळे स्वतःवरचा विश्वास वाढतो. तर्कशक्ती आणि नियोजन यामुळे योग्य कृती करून यश मिळते. कर्तृत्वाने आणि विवेकी वर्तनामुळे समाजात सन्मान प्राप्त होतो.
विकसित विवेक आणि तर्कशक्ती यांच्या साहाय्याने स्वप्रतिमा स्पष्ट होत जाते. स्व-प्रतिमा जितकी स्पष्ट होते, तितका विज्ञानमय कोशाकडून पुढच्या कोशाकडे प्रवास सुरू होतो. मॅस्लो यांनी मांडलेली आत्म-वास्तविकता ही अवस्था पंचकोशांतील आनंदमय कोशाशी संबंधित आहे. आनंदमय कोश शाश्वत आनंद, समाधान आणि आत्मानुभूती दर्शवतो. बाह्य यश किंवा संपत्तीपेक्षा अंतर्मनातून अनुभवला जाणारा शांत आणि स्थिर आनंद येथे महत्त्वाचा असतो. पुढे मॅस्लो यांनी मांडलेली सेल्फ ट्रान्सेंडन्स संकल्पना आनंदमय कोशाच्या उच्च अवस्थेशी सुसंगत आहे, जिथे व्यक्ती सर्वभूतहित, सेवा आणि एकात्मतेकडे प्रवास करते.
तथापि, या दोन संकल्पनांमध्ये काही भेदही आहेत. मॅस्लो यांची मांडणी गरजांवर आधारित असून ती ‘माणसाला काय हवे आहे’ हे सांगते; तर पंचकोश संकल्पना ‘माणूस काय आहे’ आणि त्याचा अंतर्मुख प्रवास कसा आहे, हे स्पष्ट करते. मॅस्लोमध्ये विकासाचा केंद्रबिंदू गरजांची पूर्तता आहे, तर पंचकोशांमध्ये आत्मजागृती आणि आत्मानुभूती आहे. आणि दोन्हीचे एकत्रीकरण करायचे तर गरजांची पूर्तता आत्मानुभूतीसाठी आहे!
राष्ट्रीय शिक्षण धोरणात शारीरिक, मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासावर भर दिला आहे, जो या दोन्ही संकल्पनांशी सुसंगत आहे. अखेरीस, मॅस्लो आणि पंचकोश या संकल्पना परस्परपूरक आहेत. एक विकासाची उंची दाखवते, तर दुसरी त्याची खोली स्पष्ट करते. या दोन्ही संकल्पनांचा शाळांमध्ये अंतर्भाव करताना कोणकोणते उपक्रम राबवता येतील, याचीही आपण थोडक्यात माहिती घेतली. हे सर्व उपक्रमही संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेतच. यावरूनही ही बाब स्पष्ट होईल. या दोन्हींच्या समन्वयातूनच खऱ्या अर्थाने सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साध्य होऊ शकतो. संकल्पना कोणतीही अंमलात आणा, परंतु आजच्या काळात ‘केवळ पाठ्यपुस्तकी अभ्यासक्रमांकडून संपूर्ण व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण’ याकडे प्रवास होणे गरजेचे आहे. हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मूलभूत गाभा आहे.