Taxi Protest Hemant Dhome: राज्यातील रिक्षाचालकांसाठी आणि TAXI चालकांसाठी मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात ऑटो-रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाल्यात.राज्यात 15 लाख रिक्षा आहेत.या निर्णयामुळे राज्यातील लाखो ऑटोरिक्षा, टॅक्सी चालकांचे कुटुंब उद्धवस्त होईल. त्यामुळे हा निर्णय रद्द करावा. या मागणीसाठी राज्यातील रिक्षा-टॅक्सीचालकांनी 4 मे पासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके, बस डेपो, निवासी तसेच व्यापारी भागात दररोज निदर्शने करणार आहेत. यावर अभिनेता हेमंत ढोमे याने दिलेली प्रतिक्रिया सध्या चर्चेत आहे. (Hemant Dhome on Taxi Protest)
सोशल मिडीयावर प्रतिक्रिया देताना हेमंत ढोमेने आपली भूमिका मांडली. तो म्हणाला," १५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय? एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा! महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!" असं हेमंत ढोमे म्हणाला.

मोटार परिवहन विभागाच्या नियमांनुसार रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य आहे. त्यामुळे फेरतपासणीदरम्यान चालकांना मराठी येते का, याचीही कसून पडताळणी केली जाणार आहे. मराठी बोलता न येणाऱ्या चालकांवर परवाना रद्द करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीनंतर हा मुद्दा पुढे आला. काही परप्रांतीय आणि परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे रहिवासी दाखले मिळवून रिक्षा आणि टॅक्सी परवाने मिळवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता.
परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी 1 मेपासून मराठी भाषा जाणणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठी वाचता-लिहिता न येणाऱ्या तसेच भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, या मागणीसाठी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनांच्या संयुक्त कृती समितीने सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेतली.