आज पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे. काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात पाकिस्तान पृरस्कृत दहशतवाद्यांनी 26 भारतीय पर्यटकांची अत्यंत निदर्यतेने गोळ्या घालून हत्या केली होती. या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. पाकिस्तानी आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केलं. अनेक दहशतवाद्यांना संपवलं. त्यानंतर दहशतवादाचा पाठिराखा असलेल्या पाकिस्ताने भारतावर हल्ला केला. चार दिवस दोन्ही देशांमध्ये सैन्य संघर्ष चालला. यावेळी भारताने संपूर्ण जगाला आपल्या अभेद्य एअर डिफेन्स सिस्टिमचा परिचय करुन दिला. पाकिस्तानची ड्रोन्स आणि मिसाईल्स भारताने हवेतच संपवून टाकली.
7 ते 10 मे असे चार दिवसभारत-पाकिस्तानमध्ये लढाई सुरु होती. यावेळी पाकिस्तानने दिल्लीच्या दिशेने एक बॅलेस्टिक मिसाइल डागलं होतं. हे मिसाइल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचलं असतं तर मोठा अनर्थ झाला असता. यावेळी हरियाणामध्ये असलेल्या इंडियन एअर फोर्सच्या युनिटने वेळीच Action घेत या पाकिस्तानी मिसाइलचा प्रवास सिरसामध्ये रोखला. पाकिस्तानच्या या बॅलेस्टिक मिसाइलला कसं इंटरसेप्ट केलं? त्यासाठी कुठली एअर डिफेन्स सिस्टिम वापरली? त्या इंडियन एअर फोर्सच्या शूर अधिकाऱ्यांचं नाव काय होतं? ही माहिती समोर आली आहे.
मिसाइलच्या टार्गेटवर दिल्ली
पाकिस्तानी सीमेजवळ IAF ची फॉरवड पोस्ट आहे. तिथे सिरसा येथील 45 विंगचे एअर कमोडोर एअर ऑफिसर कमांडिंग रोहित कपिल होते. त्यांच्या नेतृत्वाखाली टीमने पाकिस्तानच ‘फतेह क्लास’ किंवा ‘शाहीन-II’ हे बॅलेस्टिक मिसाइल सिरसा येथेच हवेत नष्ट केलं. त्यासाठी बराक-8 इंटरसेप्टर मिसाइल वापरण्यात आलं. ‘बराक-8’ ही जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचं वेध घेणारी एअर डिफेन्स सिस्टिम आहे. या मिसाइलच्या टार्गेटवर दिल्ली होती. 10 मे रोजी सिरसा येथे या मिसाइलचे तुकडे आढळले होते. ते फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले.
मिशन सुदर्शनचक्रचं उद्दिष्टय काय?
इंडियन एअर फोर्सच्या 45 विंगने पाकिस्तानच्या मोठ्या हल्ल्याचा कट उधळून लावताना भारताच्या एकत्रीकरण केलेल्या एअर डिफेन्स नेटवर्कची ताकद दाखवून दिली होती. आता मोदी सरकार मिशन ‘सुदर्शन चक्र’ प्रोजेक्टद्वारे ही एअर डिफेन्स सिस्टिम अधिक भक्कम करण्यावर काम करत आहे. ही बहुस्तरीय प्रणाली असेल. यात स्वदेशी क्षमता वाढवण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. भारताकडे सध्या रशियाची S-400 एअर डिफेन्स सिस्टिम आहे. त्याशिवाय बराक-8 MRSAM, आकाश आणि प्रोजेक्ट कुशावर युद्ध पातळीवर काम सुरु आहे. प्रोजेक्ट कुशा ही भारताची स्वदेशी S-400 एअर डिफेन्स सिस्टिम असेल. भारतीय शहर, रणनितीक संपत्ती, नागरिक यांची सुरक्षितता हेच मिशन सुदर्शनचक्रचं उद्दिष्टय आहे.