महाराष्ट्रातील काँग्रेसच्या बड्या नेत्याला बसणार धक्का, जवळचा विश्वासू सहकारी भाजपच्या वाटेवर
Tv9 Marathi April 22, 2026 04:45 PM

सोलापूरच्या राजकारणातून काँग्रेससाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अमोल उर्फ रॉकी बंगाळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळत आहेत. रॉकी बंगाळे यांचा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत एकाच गाडीतून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे सोलापूर काँग्रेसला मोठा सुरुंग लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेमकं काय घडलं?

पंढरपूर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अमोल बंगाळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे हे एकाच गाडीतून प्रवास करताना दिसले. ज्या बंगाळे यांची ओळख शिंदेंचे कट्टर समर्थक अशी होती. ते आता थेट भाजपच्या मंत्र्यांच्या गाडीत दिसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोशल मीडियावर या प्रवासाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. यानंतर आता अमोल बंगाळे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

अमोल बंगाळे यांचा राजकीय प्रवास

अमोल बंगाळे यांनी गेल्या दोन दशकांपासून काँग्रेसमध्ये राहून राजकारणाचे धडे गिरवले आहेत. सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख होती. ते नेहमी शिंदेंच्या सोबत असायचे. त्यांनी काँग्रेसकडून मोहोळ विधानसभा निवडणूक लढवली होती. तसेच त्यांच्या आईंनीही नुकतीच सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती.

काँग्रेसमधील नाराजीचे सत्र?

सोलापूर महानगरपालिकेत एकेकाळी एकहाती सत्ता गाजवणारी काँग्रेस आता कमकुवत होताना दिसत आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आल्यापासून पक्षातील अनेक जुने आणि दिग्गज नेते हळूहळू बाहेर पडत आहेत. यापूर्वी महेश कोठे, दिलीप माने, सुधीर खरटमल यांसारख्या मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडली आहे. आता यात अमोल बंगाळे यांचे नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.

भाजप प्रवेशाचे संकेत का?

रॉकी बंगाळे आता उघडपणे भाजप नेत्यांसोबत कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. त्यासोबतच जयकुमार गोरे यांच्याशी त्यांची वाढलेली मैत्री हे भाजप प्रवेशाचे प्रमुख लक्षण मानले जात आहे. तसेच २०२९ च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली राजकीय ताकद टिकवण्यासाठी बंगाळे भाजपचा पर्याय निवडू शकतात, असे बोलले जात आहे. यामुळे ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील असे बोललं जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.