Pahalgam Terror Attack: पहलगाम येथे घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे आहे. 22 एप्रिल रोजी दहशतवादी केलेल्या हल्ल्यात 26 जणांनी आपले प्राण गमावले… या भ्याड हल्ल्यात 4 – 5 दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी छापे टाकून दहशतवाद्यांशी संबंधित असलेले नेटवर्क उद्ध्वस्त केले. पण यामध्ये 2 काश्मिरी नागरिक असे देखील होते, ज्यांना प्राणघातक हल्ला होणार… याबद्दल सर्वकाही माहिती होतं. त्यांनी पुढाकार घेतला असता, तर पहलगाम येथे हल्ला कधी झालाच नसता… सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्याच्या काही तास आधी, दुपारी सुमारे साडेबारा वाजता, काश्मीरचे रहिवासी परवेझ अहमद आणि बशीर अहमद यांनी बैसरनमध्ये लपलेल्या तीन दहशतवाद्यांना पाहिलं होतं. या दहशतवाद्यांमध्ये फैसल जट उर्फ सुलेमान शाह, हबीब ताहीर उर्फ जिब्रान आणि हमजा अफगाणी यांचा समावेश होता.
दोन्ही हल्लेखोरांनी बशीर आणि परवेझ यांच्या घराचा दौरा केलेला. दोघे उर्दू – पंजाबी भाषेत बोलत होते… मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे अत्याधुनिक शस्त्रे होती आणि ते लश्कर-ए-तोयबा/द रेझिस्टन्स फ्रंटचा एक वरिष्ठ कमांडर अली भाई म्हणजेच मुख्य आरोपी, साजिद जट्ट याच्याबद्दल चर्चा करत होते आणि दहशतवादी हल्ला होणार हे दोन कश्मिरी नागरिकांना कळलं होतं.
तुरुंगात आहेत दोन कश्मिरी नागरिक
22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी या हल्ल्याचा कसून तपास सुरू केला. चौकशीत त्यांना असं आढळून आलं की, परवेझ अहमद आणि बशीर अहमद यांनी आदल्या दिवशी तीन दहशतवाद्यांना आश्रय दिला होता. त्यानंतर दशदवाद्यांना स्वतःच्या घरात राहण्यासाठी परवानगी दिली म्हणून यंत्रणांनी दोघांना अटक केली आणि दोघे अद्यापही तुरुंगात आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ला
22 एप्रिल 2025 हा दिवस भारतीयांसाठी काळा दिवस ठरला, कारण पहलगाम याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आणि त्यांची धर्म विचारून हत्या केली… यामध्ये 26 पर्यटकांनी स्वतःचे प्राण गमावले… मृत्यांमध्ये 25 पर्यटक होते आणि 1 स्थानिक नागरिक होता…
या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारतीय सशस्त्र दलांनी 6 आणि 7 मे रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केलं. या लष्करी कारवाईत भारतीय जवानांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील प्रमुख दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार म्हणून सुलेमान शाह, हमजा अफगाणी आणि जिब्रान भाई यांची ओळख पटली आहे. हे तिघेही लश्कर-ए-तोयबाशी संबंधित होते.