Kolhapur crime news : दारू पिऊन बापावर उलटणाऱ्या मुलाचा बापानेच काढला काटा, कोल्हापुरातील विक्रमनगरात धक्कादायक प्रकार
esakal April 22, 2026 03:45 PM

Father kills son Kolhapur : दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा बापानेच खून केल्याची घटना विक्रमनगरात घडली. सोमवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर बापाने जुनेद गफूर पठाण (वय २०) याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. मुलगा मिरवणुकीत गेल्यानंतर तो जखमी झाल्याची खोटी माहिती देत पोलिसांची दिशाभूल केली.

मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच चाकूने भोसकल्याची कबुली संशयित गफूर सुलतान पठाण (४०, रा. स्वामी समर्थनगर, विक्रमनगर) याने दिली. त्याला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली.

अधिक माहिती अशी, विक्रमनगर येथील स्वामी समर्थ कॉलनी परिसरात गफूर पठाण हे पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह राहतात. ते चिकनच्या दुकानात कामाला जातात, तर जुनेद भंगारच्या दुकानात काम करत होता. दारूच्या आहारी गेलेला जुनेद दररोज घरात येऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करून भांडण करायचा. सर्वच कुटुंबीय त्याच्या त्रासाला कंटाळले होते.

जबाबात विसंगती

राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सतीश होडगर, सहायक निरीक्षक रणजित पाटील यांनी कुटुंबीयांकडून मिळणाऱ्या माहितीची खातरजमा करण्याचा प्रयत्न सुरू केला. वडिलांच्या जबाबात विसंगती आल्याने सखोल चौकशी केली असता गफूर पठाण याने आपणच मुलाला भोसकल्याची कबुली दिली. अंमलदार विशाल शिरगावकर, शाहू तळेकर, अमोल पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न केले.

वडिलांनीच उपचारास केले दाखल

जखमी अवस्थेत पडलेल्या जुनेदला वडिलांनी रिक्षातून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. उपचार सुरू असतानाच मध्यरात्री दीडला जुनेदचा मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसरुग्णालयात दाखल झाले. त्यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

जुनेदच्या छातीला धारदार वस्तू लागल्याचे कारण डॉक्टरांकडून समजल्याने पोलिसांनी कुटुंबीयांकडे चौकशी सुरू केली. वडील गफूर याने मुलगा मिरवणुकीत गेला असताना तिथेच जखमी झाला. घरात आल्यानंतर त्याला जखमी पाहून उपचारास दाखल केले, असे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी सर्व शक्यता पडताळण्याचे ठरवून तपास गतिमान केला.

Kolhapur Crime: कोल्हापूर हादरलं! व्याजाच्या पैशांच्या बदल्यात महिलेसोबत शरीरसंबंध ठेवले

वडिलांच्या अंगावर धावून गेला

जुनेद सोमवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत घरात आला. वडील गफूर यांच्यासोबत त्याने वाद घातला. घरी आजी, आईसमोरच तो वडिलांना शिवीगाळ करत अंगावर धावून गेला. सर्वजण जेवणाची तयारी करीत असतानाच काकडी कापण्यासाठी ठेवलेला चाकू उचलून वडील गफूर यांनी जुनेदच्या छातीत खूपसला. बरगडीत खोलवर वार झाल्याने तो जखमी झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.