संपामुळे कामकाज बाधित
esakal April 22, 2026 10:45 PM

संपामुळे कामकाज बाधित
नागरिकांची विविध कामे रखडली

जव्हार, ता. २२ (बातमीदार) : महसूल कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मंगळवार (ता. २१)पासून पुकारलेल्या बेमुदत संपामुळे नागरिकांची विविध कामे रखडली आहेत. जव्हारमधील तहसील कार्यालयातील महसूल कर्मचारीदेखील संपावर गेल्यामुळे येथील कामकाज बाधित झाले आहे.

जव्हार तालुक्यात ४८ ग्रामपंचायत व दोन ग्रामदान मंडळे आहेत. येथील नागरिकांचे तहसील कार्यालयात दाखले, पेन्शनसारख्या कामांसाठी ये-जा असते. दरम्यान, शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पहिल्याच दिवशी महसूल विभागाचे कामकाज थंडावले होते, तसेच चित्र बुधवारी (ता. २२) दुसऱ्या दिवशीदेखील पहायला मिळाले. कर्मचारी जागेवर उपस्थित नसल्याने सातबारा नोंदी, विविध प्रकारचे दाखले तसेच अन्य कामकाज ठप्प पडले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे चांगलेच हाल झाले.

सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची अंमलबजावणी, सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे करावे, १० वर्षांपासून कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे. यासह १८ मागण्यांसाठी शासकीय-निमशासकीय कर्मचारी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. संपात महसूल विभागाचे कर्मचारीदेखील सहभागी झाले आहेत. परिणामी, तहसील प्रांताधिकारी व अपर जिल्हाधिकारी कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

महसूल विभागाचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने सात-बाऱ्याशी संबंधित सर्व कामे ठप्प पडली. याव्यतिरिक्त दाखले वाटप, तसेच विविध फायलींचा प्रवास थंडावला, तर भूसंपादन पुनर्वसन व अन्य विभागातही शांतता नजरेस पडत आहे. या दरम्यान, निरनिराळी कामे घेऊन तहसील व प्रांताधिकारी कार्यालयात आलेल्या जनतेला ऐनवेळी संपाची माहिती मिळत असल्याने त्यांचा भ्रमनिरास होत आहे.
---------------
आपत्ती व्यवस्थापन व निवडणूक कामे सुरू
कर्मचारी संपावेळी अत्यावश्यक सेवेअंतर्गत आपत्ती व्यवस्थापन, जनगणना व निवडणुकांशी संबंधित कामांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे हे कर्मचारी वगळता अन्य सर्वच विभागांचे कर्मचारी संपात सहभागी झाल्याने मंगळवारी (ता. २१) कार्यालयांमध्ये अधिकारी दालनात तसेच कर्मचारी बाहेर असे चित्र पाहायला मिळाले. यादरम्यान, चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने अधिकाऱ्यांनी स्वतःच कक्षाचे कुलूप उघडले.
-------------------
तहसील कार्यालयात उपलब्ध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नागरिकांची कामे होणार आहेत.
- लता धोत्रे, तहसीलदार, जव्हार
-----------------
मुलांच्या परीक्षा संपल्या आहेत, त्यामुळे पुढील शैक्षणिक कामांसाठी तहसील कार्यालयातील दाखले आवश्यक आहेत; मात्र कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारल्याने नागरिकांची कामे खोळंबली आहेत.
- सुभाष धवळू मुर्थडे, नागरिक

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.