भाजपच्या ‘युवाशक्ती जागर मोर्चा’चा मुंबईत शुभारंभ; युवकांना राष्ट्रनिर्मितीशी जोडण्याचा संकल्प
एबीपी माझा ब्युरो April 23, 2026 12:13 AM

BJP Yuvashakti Jagar Morcha : भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित ‘युवाशक्ती जागर मोर्चा’ या राज्यव्यापी दौऱ्याचा मुंबईत दणक्यात शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे राज्यातील युवकांना राष्ट्रनिर्मितीच्या ध्येयाशी जोडण्याची मोहीम सुरू झाल्याचं स्पष्ट झालं.

या उपक्रमाच्या माध्यमातून युवकांच्या उर्जेला सकारात्मक दिशा देत त्यांना विकास आणि राष्ट्रहिताच्या कार्यात सहभागी करून घेण्याचा उद्देश असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. या यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युवकांसाठी पहिलाच मोठा उपक्रम

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी सांगितले की, हा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच राबवण्यात येत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने युवकांसाठी घेतलेल्या लोककल्याणकारी निर्णयांची माहिती या यात्रेद्वारे युवकांपर्यंत पोहोचवली जाणार आहे.

सक्षम युवाशक्ती घडवण्यावर भर

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेले सक्षम आणि प्रभावी युवाशक्तीचे संघटन उभारणे हेच या यात्रेचे मुख्य ध्येय आहे.” या माध्यमातून युवकांना संघटित करून त्यांना राष्ट्रनिर्मितीत सक्रिय सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’ संदेश

‘जागर युवाशक्तीचा, सशक्त राष्ट्रनिर्मितीचा’ हा संदेश देणारी ही यात्रा राज्यभर फिरणार आहे. युवकांना एकत्र आणून त्यांना नवकल्पना, विकास आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देण्याचे काम या यात्रेद्वारे केले जाणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमास मंत्री जयकुमार गोरे, अतुल सावे, नितेश राणे, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, अशोक चव्हाण, तसेच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.