IPL 2026 दोन दिग्गजांचा आज अस्तित्व लढा, वानखेडेवर आज धोनी आणि रोहित दर्शनाची शक्यता
Marathi April 23, 2026 12:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> क्रीडा प्रतिनिधी

जेव्हा मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दादा संघ आमने सामने येतात तेव्हा तो ज्वालामुखी उद्रेक झाल्याशिवाय राहत नाही. गुरुवारी वानखेडेवर अशीच एक ‘जिंक किंवा संप’ लढत रंगणार आहे. दोन्ही संघांची गाडी सध्या रुळावरून घसरलेली. दोघांनीही सहापैकी फक्त दोन सामने जिंकलेत. त्यामुळे त्यांचे प्ले ऑफचे दरवाजे आतापासून अर्धवट बंद झालेत. म्हणजे आता प्रत्येक सामना म्हणजे अंतिम फेरीच. याच अस्तित्व लढय़ात महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दिग्गज दर्शन देण्याची शक्यता आहे. दोघेही उतरले तर मुंबईकरांना आनंदच होईल. कारण हिंदुस्थानला टी-20 चे जग जिंकून देणारे तिघेही कर्णधार एकाच सामन्यात खेळतील. त्यामुळे मुंबईकरांनो वानखेडेवर हवाई हल्ले पाहण्यासाठी सीटबेल्ट बांधून तयार राहा.

धोनी आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून बाहेर आहे आणि आता रोहित शर्माच्या दुखापतीनेही डोके बाहेर काढलेय. त्यामुळे या दोन नावांच्या खेळण्याच्या शक्यतेनेच सामन्याचे तापमान वाढले आहे. या दिग्गजांच्या जखमा कितीही असल्या तरी मैदानावर उतरण्याची त्यांची ओढ वेगळीच आहे. मंगळवारी रोहित सरावाला दिसला नाही, पण धोनीने नेट्समध्ये घाम गाळला. त्यामुळे ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून तरी तो उतरू शकतो, अशी चाहत्यांची आशा पेटली आहे.

फॉर्मचा फसवा खेळ, चेन्नईची डोकेदुखी

चेन्नईचा डाव अजूनही संतुलन आणि सातत्याच्या शोधात आहे. ऋतुराज गायकवाड अपेक्षेप्रमाणे चमकलेला नाही. सरफराज खान धावा करतोय, पण मोठी खेळीपासून अजून दूरच आहे. त्यात आयुष म्हात्रेची दुखापत. म्हणजे आधीच कमकुवत भिंतीला आणखी एक तडा गेलाय. आता जबाबदारी येते संजू सॅमसनवर. हा खेळाडू मोठय़ा सामन्यावर फुलतो, हे सर्वांना ठाऊक आहे.

गोलंदाजीतही चेन्नईला सातत्याची गरज आहे. हैदराबादविरुद्धचा पराभव अजूनही मनात आहे. पण एक आकडा त्यांच्या बाजूने बोलतोय. मागील पाच लढतींमध्ये चार वेळा चेन्नईच वरचढ ठरलाय.

मुंबईचा विजय ‘तिलक’ पण संकट कायम

मुंबईने अहमदाबादमध्ये तिलक वर्माच्या तुफानी खेळीवर विजयाची चव चाखली आणि सलग चार पराभवांची साखळी तोडली. पण जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. सूर्यकुमार यादव अजून ‘सूर्य’ झालेला नाही. सहा सामन्यांत केवळ एकच अर्धशतक. कर्णधार हार्दिक पांडय़ासुद्धा निर्णायक क्षणी चमकण्यात कमी पडतोय. मात्र जसप्रीत बुमरा लयीत परतलाय आणि अश्वनीच्या चार विकेट्सने गोलंदाजीला धार आली आहे. नवख्या नमन धीरनेही विश्वास सार्थ ठरवला आहे. आता त्यात इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स संघात दाखल झाल्याने मुंबईला नवसंजीवनी मिळाली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.