सलग तीन पराभवांमुळे तळाला असलेल्या लखनौला आज आपल्या घरच्याच मैदानावर विजयाची नौका किनाऱयावर लावण्याची संधी होती, पण जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांच्या भेदक माऱयासमोर त्यांचा डाव 119 धावांत आटोपला आणि त्यांची नौका यंदाही विजयाच्या किनाऱयावर लागू शकली नाही. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सने पुन्हा विजयाच्या ट्रकवर येत गुणतालिकेत आपले दुसरे स्थान कायम राखले. राजस्थानसाठी 43 धावांची झुंजार आणि आक्रमक फलंदाजी करणारा रवींद्र जाडेजा विजयाचा शिल्पकार ठरला.
लखनौला आपल्या पराभवाची मालिका खंडित करण्याची संधी लाभली खरी, पण त्यांचे फलंदाज संधीचे सोने करू शकले नाहीत. पहिल्या तीन षटकांत राजस्थानच्या जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांनी ऋषभ पंत आणि एडन मारक्रमची विकेट काढत तिन्ही फलंदाजांना शून्यावर बाद करण्याची किमया साधली. आयुष बदोनी सर्वप्रथम शून्यावर बाद झाला. त्यानंतर सलामीवीर मिचेल मार्शने 55 धावांची झुंजार भागी करत संघाच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न केले. पण तो बाद झाल्यावर लखनौची नौका खोलात अडकली. जी नंतर कुणीही विजयाच्या किनाऱयावर पोहोचवू शकला नाही आणि राजस्थानने लखनौच्या डावाला 119 धावांवर पूर्णविराम लावला.
तत्पूर्वी मोहम्मद शमीने आपल्या डावातील दुसऱयाच षटकात यशस्वी जैसवाल आणि ध्रुव जुरेल यांची सलग चेंडूवर विकेट काढत खळबळ माजवली. या दोन धक्क्यानंतर मोहसीन खानने आपल्या पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीची विकेट काढत लखनौला मोठे यश मिळवून दिले. 3 बाद 32 नंतर राजस्थानसाठी एकही मोठी भागी झाली नाही. मात्र रियान पराग, शिमरॉन हेटमायर आणि डोनोवन फरेरा यांनी विशीतल्या खेळय़ा करत संघाला शंभरी ओलांडून दिली. पण 6 बाद 110 अशा चिंताजनक स्थितीत असलेल्या राजस्थानसाठी जाडेजा हनुमानासारखा धावत आला. जाडेजाने शुभम दुबेच्या साथीने 49 धावांची भागी रचत राजस्थानला 159 धावांपर्यंत नेले. जाडेजाने 43 धावांची झुंजार खेळी करतच संघाला दीडशेपार नेले. हीच भागी राजस्थानसाठी मॅचविनिंग भागी ठरली.





