कोल्हापूर : दिवंगत लेखक गोविंद पानसरे यांच्या 38 वर्षापूर्वी प्रकाशीत झालेल्या शिवाजी कोण होता? या पुस्तकावरुन वादंग निर्माण झालं आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि प्रकाशक प्रशांत आंबी यांच्यातील कथित दूरध्वनी संभाषणाची ध्वनिचित्रफीत व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी प्रशांत आंबी राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. प्रशांत आंबी याच्यासोबत त्याचे इतर सहकारी आणि गोविंदराव पानसरे यांचे कुटुंबीय देखील पोलीस स्टेशनमध्ये दाकल झाले आहेत. फोनवर अश्लील शिवीगाळ करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणे, जीभ कापण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्या बाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे.
आमदार संजय गायकवाड यांनी 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:51 मिनिटांनी फोन करून धमकीत दिल्याचे तक्रार अर्जात उल्लेख करण्यात आला आहे. BNS च्या कलम 351, कलम 352, कलम 356, कलम 192 तसेच मानवी हक्क संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे. मला व माझ्या कुटुंबीयाला आमदार संजय गायकवाड यांच्याकडून आणि त्यांच्या त्याच्या गँगच्या लोकांकडून धोका असल्याचे देखील तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा एका मोठ्या वादात सापडले असून, त्यांनी शिवाजी कोण होता? या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 38 वर्षांपूर्वी लिहिलेल्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाच्या नावावरून गायकवाड यांचा संताप अनावर झाला. पुस्तकाचे शीर्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन अनादर करणारे आहे, असा दावा करत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
सोशल मीडियावर या संभाषणाची ऑडिओ क्लिप वेगाने व्हायरल होत असून यामध्ये आमदार गायकवाड यांनी आंबी यांना घरात घुसून मारण्याची आणि जीभ कापण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे, आंबी यांनी वारंवार "आधी पुस्तक वाचून घ्या" अशी विनंती करूनही गायकवाड यांनी "मला पुस्तक वाचायची गरज नाही" असे म्हणत शिवराळ भाषा वापरणे सुरूच ठेवले. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.