उन्हाळ्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस येतो. यामुळे या दिवसात डासांचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी उन्हाळ्यात डेंग्यू, मलेरिया, आणि चिकनगुणिया यासारखे आजार बळावतात. यामुळे आपण डास पळवण्यासाठी स्प्रे, कॉईलचा वापर करतो. पण तरीही डासांचा त्रास होतो. अशावेळी तुम्ही घरात किंवा तुमच्या आसपास कोणती झाडे आहेत ते तपासावे. कारण काही झाडं, वनस्पती डास आणि किटकांना आकर्षित करतात. अशा झाडांवर मोठ्या प्रमाणात डासांची पैदास होते.
ही झाडे दिसायल हिरवेगार आणि आकर्षक असतात. यामुळे काहीजण होमडेकोरसाठीही अशा झाडांचा नकळत वापर करतात. ही झाडे पाण्यावर जगणारी असतात. कोणती आहेत ही झाडे ते पाहूया.
वॉटर लिली
वॉटर लिली हे पाणवनस्पती आहे. पाणी शुद्ध करण्यासाठी तिचा वापर केला जातो. यामुळे काहीजण घरातील तलावात, फवाऱ्यांच्या ठिकाणी , पाण्याने भरलेल्या कुंड्यामध्ये वॉटर लिली लावतात. याच्या सुंदर आकर्षक पानांकडे किटक- डास आकर्षित होतात. यावरच अंडी घालतात. त्यामुळे या वनस्पतीवर कायम डास असतात.
बांबूचे झाड
बांबूचे झाडाकडे डास चुंबकाप्रमाणे आकर्षित होतात. घराच्या सजावटीसाठी अनेक जण घरात बांबूचे झाड ठेवतात. बांबूच्या झाडाची वाढ झपाट्याने होते. पण आतून पोकळ असल्याने याच्या आजूबाजूला पाणी साचते. याच पाण्यात डासांचा मुक्काम असतो. यामुळे बांबूचे झाडाच्या जवळपास स्वच्छता ठेवावी लागते.
केळ्याचे झाड
केळ्याची पानं लांब असतात. त्यामुळे बऱ्याचवेळा त्यावर पाणी जमा होते. तसेच केळ्याच्या बुंध्याशी असलेली माती कायम ओली असते. त्यामुळे डास या मातीत स्थिरावतात. अंडी घालतात. त्यामुळे केळीच्या बागा किंवा त्याच्या झाडाच्या आसपास सतत डासांचा प्रादु्र्भाव असतो.





