मुंबई : म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या (Mhada) अखत्यारीतील विविध वसाहतींमधील 295 सदनिका (home) ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, यासाठी https://bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणीची प्रक्रिया 4 मे 2026 रोजी सकाळी 11.30 वाजेपासून सुरू होणार आहे. पुणे मंडळामार्फत 20 टक्के सर्वसमावेशक व 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनांतील विक्री अभावी शिल्लक राहिलेल्या 295 सदनिका 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' योजनेमध्ये समावेश करण्यात आला असून पुणे (Pune) महानगरपालिका म्हाडा योजनेंतर्गत 113 सदनिका व पिंपरी चिंचवड म्हाडा योजनेंतर्गत 182 सदनिकांचा समावेश आहे.
या योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका क्षेत्रातील तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांमधील 1RK, 1BHK व 2BHK प्रकारातील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. चिखली, ताथवडे, वाकड, लोहगाव, मुंढवा, येवलेवाडी, वाघोली, किवळे, फुरसुंगी, डुडुळगाव, पिसोळी, बालेवाडी, हडपसर, पुनावळे आदी परिसरांतील प्रकल्पांचा या योजनेत समावेश आहे. विविध प्रकल्पांमध्ये भिन्न क्षेत्रफळ, किंमत व सुविधा उपलब्ध असल्याने अर्जदारांना त्यांच्या गरजेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.
पुणे मंडळातर्फे इच्छुक अर्जदारांना आवाहन करण्यात येत आहे कि प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेंतील सदनिकांची माहिती व योजनेत सहभागी होण्याकरिताचे मार्गदर्शन करणारी माहिती पुस्तिका https://bookmyhome.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात येणार आहे. या पुस्तिकेचे अवलोकन करूनच योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांनी याच संकेतस्थळावरून अर्ज नोंदणी करावयाची आहे. अर्ज नोंदणी झाल्यानंतरच ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे,अर्ज शुल्क भरणा,योजना/ सदनिका निश्चिती करणे, हि प्रक्रिया 4 मे रोजी सकाळी 11.30 वाजेपासून कार्यान्वित होणार आहे.
“प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य” या तत्वानुसार अर्जदारांना उपलब्ध सदनिकांमधून तत्काळ निवड करण्याची सुविधा उपलब्ध असेल. सदनिका निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत अर्जदाराने सदनिकेच्या विक्री किंमतीच्या १० टक्के रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. ही रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने सदनिकेची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल. निर्धारित कालावधीत भरणा न केल्यास संबंधित सदनिकेवरील हक्क आपोआप रद्द होऊन ती पुढील अर्जदारासाठी उपलब्ध होईल. अनामत रकमेचा परतावा केवळ नियमांनुसारच करण्यात येईल व त्यावर कोणतेही व्याज देण्यात येणार नाही. अल्प उत्पन्न गट (LIG) तसेच आर्थिक दुर्बल घटक (EWS) अर्जदारांसाठी अनामत रक्कम रु. 20,000/- निश्चित करण्यात आली आहे. अर्ज फी रु. 600/- असून त्यावर जीएसटी (रु. 108/-) आकारला जाईल. त्यामुळे अर्जाच्या वेळी एकूण रु. 20,708/- इतका प्रारंभिक भरणा आवश्यक राहील.
पात्रतेच्या अटींनुसार अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा किंवा मागील 20 वर्षांपैकी किमान 15 वर्षे महाराष्ट्रात वास्तव्यास असावा. आर्थिक वर्ष 2024-25 व 2025-26 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा (आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदार दाखला) सादर करणे बंधनकारक राहील. अर्ज करताना अर्जदाराने स्वतःच्या बँक खात्याचा क्रमांक व IFSC कोड अचूक नमूद करणे आवश्यक असून अनामत रकमेचा परतावा त्याच खात्यावर करण्यात येईल. सदर प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन व संगणकीय प्रणालीद्वारे राबविण्यात येत असून कोणत्याही प्रकारचा मानवी हस्तक्षेप राहणार नाही. म्हाडाने कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांची नेमणूक केलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी पडू नये व केवळ अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. सर्व प्रकारचा पत्रव्यवहार ई-मेल, एसएमएस व अर्जदाराच्या लॉगिनद्वारेच करण्यात येणार असल्यामुळे अर्जदारांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी अचूक व सक्रिय ठेवणे आवश्यक आहे.
योजनेअंतर्गत उपलब्ध सदनिकांवर प्रलंबित असलेले मालमत्ता कर, देखभाल शुल्क व इतर देयके संबंधित लाभार्थ्याने अदा करणे आवश्यक राहील. यशस्वी अर्जदारांनी संबंधित गृहनिर्माण संस्थेचे सभासद होणे बंधनकारक राहील. देकारपत्र निर्गमित झाल्यानंतर अर्जदाराने परतावा मागितल्यास सदनिकेच्या किमतीच्या १ टक्के रक्कम कपात करून उर्वरित रक्कम विना व्याज परत करण्यात येईल. अधिक माहितीसाठी इच्छुक अर्जदारांनी म्हाडा लॉटरी मदत केंद्र, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, तळमजला, आगरकर नगर, पुणे-४११००१ येथे संपर्क साधावा. दूरध्वनी क्रमांक 020-26128856, लॉटरी हेल्पलाईन 022-69468100 तसेच अनामत रक्कम भरण्यासंबंधी सहाय्यासाठी 7030900265 / 18008918297 या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. तसेच support.mhadapunelottery@easebuzz.in या ई-मेलद्वारेही संपर्क साधता येईल.
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम