पश्चिम बंगालमध्ये काल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं. त्याआधी 22 एप्रिलला टीव्ही अभिनेत्री पुजा बॅनर्जीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. यात पश्चिम बंगालमधून दररोज सुरु असलेल्या पलायनावर तिने भाष्य केलं. बंगालमध्ये युवांना आधार देणाऱ्या इंडस्ट्रीजची कमतरता आहे असं तिने म्हटलं. “बंगालचे युवा आपल्या मर्जीने बंगाल सोडत नाहीयत. हे पलायन नाही, नाईलाज आहे. दरदिवशी हजारो लोक निघून जातात. त्यांना मनापासून निघून जायचं आहे, असं नाहीय. सत्य खूप सरळ आहे. लोक तिथेच राहतात, जिथे संधी असते. जिथे संधी नसते, तिथून निघून जातात. कॅपिटल फॉर्मेशन 6.7 टक्क्यांवरुन 3 टक्क्यांपेक्षा पण खाली आलं आहे. हे आकडा फक्त डाटा नाही, तर कारखाने बनवतो” असं पूजा बॅनर्जीने म्हटलं आहे.
“दुसरी शहरं वाढतायत, पसरतायत, काही नवीन बनवतायत. म्हणून लोक तिथे जातात. तुम्ही एका पिढीला किती वाट पहायला सांगणार आहात?. तुम्ही त्यांना कधीपर्यंत तडजोड करायला सागंणार?. इथून निघून जाणं हा एकमात्र पर्याय कधीपर्यंत राहणार?. आम्ही खूप शिकलो, तर इथेच आम्हाला नोकरी मिळणार हे ऐकत आम्ही मोठे झालो आहोत. पण कुठे ना कुठे असं होत नाहीय” बंगालच्या परिस्थितीवर असं परखड भाष्य पूजा बॅनर्जीने केलय.
हे पलायन नाही, एक शांत निरोप
“जास्त डिग्री, जास्त ग्रॅज्युएट्स, पण त्या हिशोबाने पुरेशा नोकऱ्या नाहीत. ही तीच भूमी आहे, ज्यांनी रवींद्रनाथ टागोर, सुभाष चंद्र बोस, सत्यजीत रे सारखे लोक दिले. टॅलेंट कधी समस्या नव्हती. आम्हाला इथे स्वप्न बघायला शिकवलं, फक्त इथे भारतात ती स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीत. आम्ही जिथे कुठे जाऊ, तिथे बंगालला सोबत घेऊन जाऊ. पण आमच्यावर इथून जाण्याची वेळ येऊ नये. हे पलायन नाही, एक शांत निरोप आहे” असं पूजा बॅनर्जीने म्हटलय.
View this post on Instagram
पश्चिम बंगाल निवडणुकीचे निकाल कधी?
पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार आहे. काल 23 एप्रिलला पहिल्या टप्प्यासाठी मतदान झालं. 29 एप्रिलला दुसऱ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. 4 मे रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमुल काँग्रेस आणि भाजपमध्ये सामना आहे.